कौतुकाची एक थापसुद्धा मनाला उभारी देणारी ठरते

By Admin | Updated: July 23, 2015 00:12 IST2015-07-22T23:38:52+5:302015-07-23T00:12:24+5:30

अपंग म्हणून आम्ही कधीही समाजावर ओझे होऊन राहणार नाही : सुतार

A fondness of appreciation is also a matter of pride | कौतुकाची एक थापसुद्धा मनाला उभारी देणारी ठरते

कौतुकाची एक थापसुद्धा मनाला उभारी देणारी ठरते

अपंग म्हणून आम्ही कधीही समाजावर ओझे होऊन राहणार नाही. आम्हालाही संधी द्या, त्या संधीचे सोनं करण्याची आमचीही ताकत आहे. फुटबॉल, क्रिकेट, टेनिस अशा खेळांत सर्वसामान्य खेळाडूने उच्च दर्जाची कामगिरी केली तर त्याचे जंगी स्वागत केले जाते. मात्र, अपंगांनी कोणत्याही जागतिक, राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर त्याच्या स्वागताला एक गुलाबपुष्पसुद्धा कोणी देत नाही. अशा आम्हा अपंगांना समाजाने एक शाबासकीची थाप आमच्या पाठीवर दिली, तर नक्कीच आम्ही चांगली नव्हे उच्च दर्जाची कामगिरी करू, असा विश्वास वैष्णवी सुतार यांनी व्यक्त केला. असाध्य ‘मस्कुलर डिस्टॉफी’ अशा रोगामुळे हातातील व पायातील कमकुवतपणामुळे अपंगत्व प्राप्त झालेल्या; पण खचून न जाता अपंगांच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसच्या विश्व गुण क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या व आशियाई गुण क्रमवारीत १७ व्या स्थानी असलेल्या कोल्हापूरच्या वैष्णवी सुतार यांच्याशी साधलेला थेट संवाद...
प्रश्न : राज्य शासनाचे अपंग खेळाडूंबाबतचे धोरण योग्य वाटते का?
उत्तर : अपंग खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जाताना राज्य शासनाने विशेष तरतूद म्हणून खेळाडूंना प्रवासात सवलत द्यावी. आमच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनाही ही सवलत लागू केली पाहिजे. विशेष म्हणजे देशाबाहेर असणाऱ्या स्पर्धांना जागतिक संघटनेची मान्यता असल्यामुळे त्या स्पर्धांना जाताना शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे. आमचा खेळ हा सर्वसामान्यांसारखाच खेळला जातो. क्रीडासंकुले बांधताना क्रीडा विभागाने अपंगांसाठी विशेष सोयी सवलती केल्या पाहिजेत. कारण राज्यात कोठेही गेल्यानंतर आमच्यासाठी काहीच केलेले नाही. केवळ कागदोपत्रांचा फार्स केला जातो. त्यामुळे ती कागदपत्रे जमा करताना मुंबईसारख्या ठिकाणी तर अनेक मजले उतरणे, चढणे मोठे जिकिरीचे काम असते. त्यामुळे ‘नको ही मदत’ अशी म्हणण्याची वेळ आमच्यासारख्या अपंग खेळाडूंना येते. अपंग खेळाडू जर परदेशी स्पर्धा खेळण्यास जाणार असेल, तर त्याला आर्थिक मदतीची गरज लागते. अशावेळी शासनाने विशेष तरतूद करावी.
प्रश्न : आतापर्यंत आपण अपंगांच्या टेबल टेनिस स्पर्धेत काय कामगिरी केली आहे?
उत्तर : २०१३ मध्ये थायलंड येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरॉआॅलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक, तर २०१४ साली इन्चिओन कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा टेनिस स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला. यावर्षी पुन्हा जुलै २०१५ मध्ये थायलंड येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे भारतीय संघात निवड झाली आहे. याशिवाय तैवान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. बंगलोर, नवी दिल्ली येथे सन २०१२, २०१३ सालचे वरिष्ठ गटातील विजेतेपदही पटकावले आहे. २०१३ मध्ये इंदोर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई रिजनल चॅम्पियनशीप स्पर्धेतही भारतातर्फे कांस्यपदक पटकावले. यासह अन्य राष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी केली.
प्रश्न : आपले टेबल टेनिसमधील लक्ष्य काय आहे?
उत्तर : मी २०११ साली माझे पती विनायक सुतार यांच्या आग्रहामुळे टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. प्रथम मला कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे टेबल टेनिसपटू संग्राम चव्हाण यांनी टेबल टेनिसचे प्राथमिक धडे दिले. त्यानुसार घरातही टेबल टेनिसचा टेबल सरावासाठी दिला. त्यामुळे माझ्यासह माझे सहकारी देवदत्त माने, विकास चौगुले, उज्ज्वला चव्हाण, उमेश चटके, विवेक मोटे, नागेश सुतार हेही टेबल टेनिसमध्ये पारंगत झाले. माझी सध्या थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेतील कामगिरीनंतर माझे वर्ल्ड रँकिंग सुधारणार आहे. सध्या मी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर, तर आशियाई क्रमवारीत १७व्या स्थानावर आहे. मला पॅरॉआॅलिम्पिकसाठी प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे मी सध्या खेळावर फोकस केला आहे. मी सकाळी तीन तास आणि सायंकाळी दोन तास सराव करते.
प्रश्न : शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे?
उत्तर : राज्य शासनाने अपंगांना लागणारे खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना दिलासा मिळेल. त्यातून आणखी चांगली कामगिरी करण्याची ऊर्मी त्यांच्यात येईल. मी खेळते त्या टेबल टेनिसच्या रॅकेटची किंमत किमान पाच हजार इतकी आहे, तर टेबल साधारणत: ३५ हजारांच्या आसपास आहे. याशिवाय माझे अन्य सहकारीही क्रिकेट, गोळाफेक, सायकलिंग, धावणे या स्पर्धांत सातत्याने भाग घेत असतात. त्यांना योग्यवेळी प्रशिक्षक आणि खेळाच्या साहित्याची गरज असते. मात्र, साहित्य नसल्याने अनेकांना स्पर्धेत चांगली कामगिरी करता येत नाही.
प्रश्न : आमच्याही कामगिरीचा विचार ‘शिवछत्रपतीं’सारख्या पुरस्कारांसाठी व्हावा?
उत्तर : आमचे अपंग खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करतात. अनेक पॅरॉआॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावतात. मात्र, त्यांना सर्वसामान्य खेळाडूंसारखी शासनाकडून ट्रिटमेंट मिळत नाही. किंबहुना, त्यांच्या कामगिरीची दखलही घेतली जात नाही. माझ्यासारखे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतात. मात्र, त्यांच्या कामगिरीचा विचार केला जात नाही. आम्हालाही वाटते, नॉर्मल खेळाडूंसारखे जे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी, आदी खेळांत चमकदार कामगिरी करतात, त्यांना अर्जुन, शिवछत्रपती, यांसारखे पुरस्कार राज्य, केंद्र शासन देते; मग आम्ही त्यांच्यासारखीच कामगिरी करतो. तरीही आम्हाला डावलले जाते. आमचाही विचार या पुरस्कारांसाठी व्हावा.
- सचिन भोसले

Web Title: A fondness of appreciation is also a matter of pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.