हातकणंगले तालुक्यातील महापूर पीक पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:54+5:302021-09-02T04:50:54+5:30
हातकणंगले : तालुक्यातील वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ऊसपिकाचे क्षेत्र ...

हातकणंगले तालुक्यातील महापूर पीक पंचनामे पूर्ण
हातकणंगले : तालुक्यातील वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ऊसपिकाचे क्षेत्र बाधित झाले आहे. उसाचे ९६१९ क्षेत्र बाधित होऊन नुकसान झाले आहे. तालुक्यातील २६७०३ शेतकरी नुकसानभरपाईस पात्र पीकनिहाय यादी तालुका कृषी विभाग आणि तहसीलदार यांच्याकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे.
तालुक्यातील ६३ गावांपैकी २८ गावांमध्ये अतिवृष्टी आणि महापूर झाल्याची नोंद आहे. पंचगंगा काठावरील चोकाक, शिरोली, हालोंडी, हेरले, रुकडी, माणगाव, इचलकरंजी, रुई, चंदूर, साजणी, हुपरी, पट्टणकोडोली, रेंदाळ, इंगळी आणि रांगोळी या १५ गावातील तसेच वारणा नदी काठावरील कुंभोज, हिंगणगाव, निलेवाडी, परगाव, चावरे, तळसंदे, घुणकी, किणी, भादोले, लाटवडे, खोची, भेंडवडे आणि वाठार तर्फ उदगाव या १३ गावे अशा २८ गावांमध्ये महापूर आणि अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टी आणि महापूर यामध्ये तालुक्यातील २६७०३ शेतकऱ्यांच्या जिरायत आणि बागायत पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक पंचनामे होऊन अंतिम यादीनुसार नुकसान झालेले पीक आणि क्षेत्र...
ऊस = ७९ हेक्टर ७६ आर.
सोयाबीन = ५६४ हेक्टर ४२ आर.
भुईमूग = २३४ हेक्टर ०१ आर.
भात = २ हेक्टर ७२ आर
ज्वारी = २७ हेक्टर ०१ आर.
भाजीपाला = ० हेक्टर २० आर.
पपई = १० हेक्टर ०१ आर.
केळी = ३० हेक्टर ०८ आर.
याप्रमाणे पीक नुकसान क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अंतिम शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे तालुका कृषी विभाग आणि तहसीलदार हातकणंगले यांच्याकडून पाठविण्यात आली आहे.
चौकट
कृषी सहायकाकडे लॅपटॉपची सुविधा नसल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या संग्राम सेवा डाटा ऑपरेटरची किंवा ऑनलाईन सेंटरची मदत घ्यावी लागल्याने पीक पंचनामे ऑनलाईन डाटा भरण्यामध्ये विलंब झाल्याचे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.