योग्यवेळी पाण्याचा विसर्ग करून पूरनियंत्रण करणार, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:49 IST2021-06-01T10:47:30+5:302021-06-01T10:49:39+5:30
Flood Kolhapur : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांना कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. यामुळे पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तिन्ही जिल्ह्यांतील धरणांतील धोका पत्करून पाण्याचा विसर्ग करण्याचा व त्याआधारे पूर नियंत्रण करण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरनियंत्रण बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या संभाव्य पूरनियंत्रण पूर्वतयारी बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विविध सूचना दिल्या. या वेळी मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. (फोटो : नसीर अत्तार)
कोल्हापूर : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांना कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. यामुळे पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तिन्ही जिल्ह्यांतील धरणांतील धोका पत्करून पाण्याचा विसर्ग करण्याचा व त्याआधारे पूर नियंत्रण करण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरनियंत्रण बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. तिन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदार ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.
मंत्री पाटील म्हणाले की, मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर, एकाचवेळी सर्व धरणांतील पाणी सोडले जाते. परिणामी महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे हा धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करावे. हवामान आणि पाऊस याचा अभ्यास करून धरणांमधील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे.
मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करावीत. महापूर आल्यानंतर किती गावांतील किती लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, त्याचे नियोजन केले आहे; पण पूरस्थितीच निर्माण होणार नाही, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.
खासदार संजय मंडलिक म्हणाले की, पावसाचे पाणी अडण्यासाठी अर्धवट पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील धामणी धरणाचे काम पूर्ण करावे. राधानगरी धरणाला सर्व्हिस गेट बसवावे. बैठकीत महापुरास पूररेषेतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा विषय चर्चेत आला. यावर मंत्री पाटील म्हणाले की, यासंबंधीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेऊन कार्यवाही करावी.
बैठकीच्या सुरुवातीलाच पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुन्हाले यांनी पूर नियंत्रणासाठी केलेल्या सर्व उपायांची माहिती दिली. ते म्हणाले की, कृष्णा खोऱ्यातील नद्यांची पाणीपातळी पावसाळ्यात त्या-त्या वेळी नेमकेपणाने कळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात येईल. याद्वारे रियल टाईम डाटा अॅनॅलेसिस सिस्टिम आणि रियल टाईम डिसिजन सपोर्ट सिस्टिम कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे नद्यांमधील पाणीपातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
बैठकीस आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रकाश आवाडे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध सूचना केल्या.
कर्नाटकात मोठे नुकसान
गेल्यावर्षी पूर टाळण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर समन्वय ठेवून अलमट्टीचा विसर्ग ५ लाख क्युसेकपर्यंत वाढवला. यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील बाजूस पूरस्थिती गंभीर झाली. तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. हाही मुद्दा या वेळी विचारात घ्यावा, अशी सूचना जलसंपदामंत्री पाटील यांनी दिली.