वीज ग्राहकांना १ जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार, महावितरण नवीन दर लागू करणार 

By भीमगोंड देसाई | Updated: June 28, 2025 16:15 IST2025-06-28T16:15:07+5:302025-06-28T16:15:30+5:30

ग्रामपंचायत, महापालिका, सार्वजनिक वापरासाठी वीजदर कमी

Fixed size surcharge for electricity consumers from July 1, Mahavitaran to implement new rates | वीज ग्राहकांना १ जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार, महावितरण नवीन दर लागू करणार 

वीज ग्राहकांना १ जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार, महावितरण नवीन दर लागू करणार 

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) येत्या मंगळवारपासून (दि. १) नवीन वीजदर लागू होणार आहे. यामध्ये सन २०२४-२५ च्या तुलनेत नव्याने लागू होणाऱ्या वीजदरात स्थिर दर मात्र वाढवला आहे. ग्रामपंचायत, महापालिका, सार्वजनिक वापर, घरगुती दारिद्र्य रेषेखालील आणि शंभर युनिटच्या आत विजेचा वापर असणाऱ्यांच्या एकूण वीज युनिटमध्ये कपात झाली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २५ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुधारित दरपत्रकानुसार हे स्पष्ट झाले आहे.

विद्युत नियामक आयोगाने सन २०२४-२५ म्हणजे आताचे आणि १ जुलैपासून लागू होणारे म्हणजे २०२५-२६ या वर्षासाठी वीजदर जाहीर केले आहे. यामध्ये सध्याच्या दरपत्रकात स्थिर आकार, युनिटचे दर आणि नवीन वीजदर तर नवीन लागू होणाऱ्या पत्रकात स्थिर आकार, वीज आकार, वीज वहन दर, युनिटचा दर असे दरपत्रक जाहीर केले आहे.

यानुसार दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठीच्या स्थिर आकारात कोणतीही वाढ केली नसून, महिन्याला ३४ रुपयेच कायम ठेवले आहे. युनिटच्या दरात कपात केली असून, १.७४ ऐवजी १.४८ रुपये असा असेल. १०० युनिटच्या वर घरगुतीसाठी वीज वापरणाऱ्यांना स्थिर आकार १२८ ऐवजी १३० रुपये, व्यावसायिक कारणासाठी ५१७ ऐवजी ५२५ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याच्या आणि नवीन वीजदरपत्रकाची तुलना केली तर स्थिर आकारात वाढ झाल्याचे समोर आले आहे.

प्रकार - सध्याचे स्थिर आकार - सुधारित स्थिर आकार
घरगुती - १२८- १३०
व्यावसायिक - ५१७- ५२० ते ५२५
सार्वजनिक पाणी वापर विद्युत पंप - १२९ ते १९४ - १४० ते २००
उद्योग - ५८३ - ६००
पथदिवे - १४२- १५०
शासकीय वापर : ४२७- ४५०
खासगी सार्वजनिक सेवा - ४६४- ५००

वाहन चार्जिंगसाठी वाढ

ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर आता पर युनिट ८ रुपये ४७ पैसे असा वीजदर आहे. येत्या मंगळवारपासून पर युनिटसाठी ९ रुपये १ पैसे द्यावे लागणार आहेत.

सध्याचे पर युनिटचे दर आणि सुधारित दर

घरगुतीसाठी १०० युनिटपर्यंत पर युनिट ६.३२ रुपयांऐवजी ५.७४ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी १२.२३ रुपये ऐवजी १२.५७ रुपये, ५०० युनिटपर्यंत १८.९३ ऐवजी १९.१५ रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिकसाठी २० किलोवॅटसाठी १०.४६ ऐवजी १०.३७ रुपये, ५० किलो वॅटपर्यंत १५.३८ रुपयांऐवजी १४.२२ रुपये, उद्योगासाठी २० किलो वॅटसाठी ७.८५ ऐवजी ७.८६, वीस किलो वॅटवरील वीजवापरासाठी ९.१४ ऐवजी ९.१५ रुपये, ग्रामपंचायती आणि महापालिकेसाठी ८.५७ ऐवजी ८.५१ रुपये, शासकीय सार्वजनिक वापरासाठी २० किलो वॅटसाठी ६.३ ऐवजी ४.७२, पन्नास किलो वॅटपर्यंत ८.१२ ऐवजी ७.८५ रुपये असे वीजदर लागू होणार आहे.

महावितरणने सुधारित दरपत्रकात छुपी दरवाढ केल्याचे स्पष्टपणे दिसते. दरकपात केल्याचे खोटे सांगितले जात आहे. वीजदर वाढ होणार असल्याने प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. -संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
 

राज्यातील वीज ग्राहकांसाठी १ जुलै २०२५ पासून दरकपात लागू होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सर्व घटकांसाठी वीजदर कमी केला आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक वर्षी वीजदरात घट होत जाणार आहे. -लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण

Web Title: Fixed size surcharge for electricity consumers from July 1, Mahavitaran to implement new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.