पाच हजार जणांना नोकरीची संधी
By Admin | Updated: December 5, 2014 00:24 IST2014-12-05T00:07:39+5:302014-12-05T00:24:10+5:30
‘एक कुटुंब, एक नोकरी’ उपक्रम : प्रशिक्षणासाठी १० ते ११ डिसेंबरला मुलाखतीचे नियोजन

पाच हजार जणांना नोकरीची संधी
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत ‘एक कुटुंब, एक नोकरी’ या उपक्रमाखाली यंदा जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील पाच हजार पात्र बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, पुणे, गडहिंग्लज या भागातील कंपन्यांकडून आवश्यक मनुष्यबळाची मागणी मागवून घेतली आहे. विविध कंपन्यांसाठी ८ हजार ४८० जणांची आवश्यकता आहे. नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणासाठी १० ते ११ डिसेंबरला तालुकास्तरावर मुलाखती घेण्याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केले आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी गेल्या वर्षापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमातून आठवी पास-नापास, आयटीआय, बारावी पास-नापास विद्यार्थ्यांना निवडलेल्या ट्रेंडचे ३० ते ४५ दिवसांपर्यंत तालुकास्तरावरच मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित बेरोजगारांना मनुष्यबळ मागणी असलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून मुलाखतीद्वारे नोकरी दिली जाते.
गतवर्षी शासनाकडून १२०चे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी असताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने १०९५ उमेदवारांना प्रशिक्षण व किमान कौशल्य देऊन नोकरी मिळवून दिली. यंदा १८ ते ३५ या वयोगटांतील दारिद्र्यरेषेखाली पाच हजार पात्र बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तालुका, गावपातळीवर अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने कमीतकमी दहा दारिद्र्यरेषेखालील बेरोजगारांचे अर्ज देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार तालुकानिहाय उद्दिष्ट्ये देऊन चालूवर्षी २५ हजार ९०० अर्ज संकलित केले जाणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून टप्प्याटप्प्याने रोजगार मिळवून दिला जाणार आहे.
यंदा पाच हजार बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ११ स्वयंसेवी संस्थांची निवड बेरोजगारांना प्रशिक्षणासाठी केली आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये येण्या-जाण्याचा खर्च म्हणून प्रत्येकास ७५ रुपये भत्ता दिला जाणार आहे. उमेदवारांची सोय व्हावी म्हणून या संस्थांतर्फेच नोकरी दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, प्रकल्प संचालक पी. बी. पाटील अधिकाधिक पात्र बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी पाठपुरावा करीत आहेत.
सध्या मनुष्यबळाची मागणी ट्रेंडनिहाय अशी
विभागमागणी
गारमेंट सिव्हिंग मशीन आॅपरेटर९५०
सीएनसी, व्हीएमसी१९४१
टर्नर४५०
टर्नर असिस्टंट४५०
फिटर११५६
वेल्डर३५०
अकौटंट असिस्टंट३५०
इंडस्ट्रियल प्रॉडक्शन असिस्टंट९७०
फौंड्रीमन२६७
इलेक्ट्रिकल वायरमन७००
मशिनिस्ट ८९९
तालुकानिहाय
अर्जांचे उद्दिष्ट असे
आजरा - १५७५
गगनबावडा - ५००
भुदरगड - १५७५
चंदगड - १५७५
गडहिंग्लज - १९५८
हातकणंगले - ३७१५
पन्हाळा - १९३९
कागल - ३१२०
करवीर - ३७१५
शाहूवाडी - १६६२
राधानगरी - १८३६
४शिरोळ - २७३०
ग्रामसेवकांकडून उमेदवारांचे अर्ज तालुकापातळीवर संकलन केले आहे. अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडीसाठी १० ते ११ डिसेंबरला तालुका पातळीवर मुलाखत घेण्याचे नियोजन केले आहे. मुलाखतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारास १५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- सचिन पानारी, साहाय्यक प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद