भोगावती नदीत मळीमिश्रित पाण्याने मासे मृत
By Admin | Updated: December 21, 2014 00:52 IST2014-12-21T00:46:55+5:302014-12-21T00:52:07+5:30
हळदीजवळ लोकांची झुंबड : प्रदूषित पाणी सोडले कोणी याबाबत संभ्रम

भोगावती नदीत मळीमिश्रित पाण्याने मासे मृत
विश्वास पाटील / कोल्हापूर
अत्यंत दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत सोडल्याने सायंकाळनंतर हळदी (ता. करवीर) येथील बंधाऱ्याजवळ नदीतील हजारो मासे मेले. हे मासे पोत्यात भरून नेण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची झुंबड उडाली. नदीत हे पाणी सोडले कोणी याबाबत मात्र स्पष्टता झाली नाही. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी हे पाणी कारखान्याने सोडले नसल्याचे सांगितले. ते पाणी डिस्टिलरीचेही नाही; कारण कारखान्याने पाणी सोडले असते तर परिते बंधाऱ्यापासूनच ते दूषित व्हायला हवे होते असा दावा त्यांनी केला; परंतु लोकांच्या तक्रारी आल्याने पाटबंधारे विभागास कळवून नदीत धरणातून पाणी सोडायला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. प्रदूषित पाणी भोगावती कारखान्याने सोडले नसेल तर हे पाणी आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या भोगावती नदीत फारसे पाणी नाही. त्यामुळे हळदी बंधाऱ्यास बरगे घालून पाणी अडविण्यात आले आहे. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास या पाण्यात दुर्गंधीयुक्त पाण्याचे लोट मिसळले. गटारीतील पाण्यासारखे हे पाणी काळे होते. हे पाणी धरणात साचून राहिल्याने प्रदूषणाची तीव्रता जास्तच वाढली. ती तीव्रता इतकी होती की पाण्यातील माशांचा जीव गुदमरला. त्यामुळे मोठे मासे जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर आले.
भोगावती नदीत मळीमिश्रित पाण्याने मासे मृत
लहान मासे मरून नदीत तरंगू लागले. आज हळदीचा आठवडा बाजार असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील लोक तिथे भाजीपाला खरेदीसाठी येतात. तास-दीड तासातच नदी पांढरीखड झाली. सगळीकडे मासेच मासे तरंगू लागले. तोपर्यंत नदीत मळीचे पाणी सोडल्याने मासे मरू लागल्याची वार्ता भागात पसरली. त्या परिसरातील दहा-बारा तरुण बंदुका घेऊनच धरणावर आले. पाण्याच्या पृष्ठभागावर तोंड वर करून आॅक्सिजन घेणारे मासे मारण्याची त्यांच्यात जणू स्पर्धाच लागली. दहा ते वीस किलोंचे मासे या बंदूकधाऱ्यांनी मारले. लहान-लहान मासे गोळा करून अनेकांनी नदीकाठावर आणले. काहींनी ते पाच-दहा रुपये किलोने विकलेही. भाजीपाला आणण्यासाठी आलेल्या लोकांनी जाताना मासेच पिशव्यांतून भरून नेले. बंधाऱ्याजवळ सुमारे दीड-दोन हजारांचा जमाव यावेळी जमला होता. रात्री उशिराही सडोलीसह हळदी, कुर्डू परिसरातील तरुण बॅटऱ्या घेऊन मासे पकडण्यासाठी नदीकाठी फिरत होते.
‘भोगावती’चे म्हणणे असे...
भोगावती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. ते म्हणाले, ‘नदीत मिसळलेले पाणी कारखान्याचे व डिस्टिलरीचेही नाही; कारण डिस्टिलरीचे टँक अजून अर्धेच भरले आहेत. त्यामुळे ते ओव्हरफ्लो होऊन मळीमिश्रित द्राव नदीत मिसळला असे होण्याची शक्यता नाही. कारखान्यातील प्रदूषित पाणी आम्ही शेतीला वापरतो. त्यामुळे त्यानेही मासे मरण्याची शक्यता नाही. कारखान्याने मळीमिश्रित पाणी सोडले असते तर परिते बंधाऱ्याजवळचे मासेही मरायला हवे होते. ते फक्त हळदी बंधाऱ्याजवळच मेले आहेत. त्यामुळे बॉम्बब्लास्ट करून मासे मारण्याचा प्रकार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
नदीत पाणी सोडले...
नदीत मासे मेले आहेत व त्यास दुर्गंधी सुटली असल्याची माहिती मिळाल्यावर भोगावती कारखान्याच्या प्रशासनाने राधानगरी पाटबंधारे विभागास धरणातून नदीत पाणी सोडण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी नदीत पाणी सोडले असल्याची माहितीही कार्यकारी संचालक पाटील यांनी दिली.
‘दालमिया’वर यापूर्वी कारवाई
गतवर्षी आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी ओढ्यातून कासारी नदीत सोडल्याचे स्पष्ट झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर कारवाई केली होती. त्यामुळे कारखाना ३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत बारा दिवस बंद राहिला. सुमारे सात हजार टन ऊस गाडीअड्ड्यात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
भोगावती कारखान्याची दक्षता
मळीमिश्रित पाण्याने नदीतील मासे मेल्याची माहिती भोगावती कारखान्याच्या व्यवस्थापनास समजल्यावर दोघा संचालकांनी तातडीने बंधाऱ्याचे बरगे काढण्याची सूचना कारखान्यास केली. त्यानुसार डिस्टिलरी विभागाचे चार-पाच कर्मचारी येऊन त्यांनी साडेसहाच्या सुमारास हळदी बंधाऱ्याचे बरगे काढले. हे बरगे तिथे बंधाऱ्यावर पडलेले होते. त्यामुळे तुंबलेले पाणी वाहून गेले; परंतु तरीही दुर्गंधी कमी झाली नव्हती. कारखान्याचे पर्यावरण अभियंता एस. के. भोसले यांनी डिस्टिलरीपासून हळदीपर्यंतच्या पाण्याची तपासणी केल्याचे लोकांनी सांगितले; परंतु ‘लोकमत’ने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आज कामावर नव्हतो. महावीर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा होत्या, तिकडे गेलो होतो; त्यामुळे मला पाणी नदीत कोणी सोडले याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
किती हे धाडस...?
देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश आहे आणि पंचगंगेची भोगावती ही प्रमुख उपवाहिनी आहे. नदीच्या प्रदूषणाबद्दल समाजापासून न्यायालयापर्यंत सगळेच जागरूक झाले आहेत. उच्च न्यायालयाने पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या उपाययोजना अजून अस्तित्वात