पहिली कुस्ती, नंतर दोस्ती !

By Admin | Updated: June 8, 2014 01:06 IST2014-06-08T01:00:11+5:302014-06-08T01:06:31+5:30

विधानसभा निवडणूक : कॉँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक; पुन्हा स्वबळावर लढण्याचे दावे

First wrestling, then friendship! | पहिली कुस्ती, नंतर दोस्ती !

पहिली कुस्ती, नंतर दोस्ती !

मुंबईत काल, शुक्रवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या या पक्षाचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादी दगाबाजी करते म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांची तर नेहमीच स्वबळावर लढण्याची मागणी असते. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव होऊनही या पक्षांना बदललेले राजकीय वारे अजून झोंबलेले नाही. स्वबळावर लढण्यासंदर्भात या दोन्ही पक्षांच्या भूमिका मांडण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न..
१९९९ च्या फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादी आग्रही
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची झालेली पडझड, राज्यात घोंगावणारे महायुतीचे वारे या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत कॉँग्रेसशी आघाडी केली, तर जिथे निवडणूक लढविली जाणार नाही, अशा दीडशे विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्ते राहणार नाहीत. यासाठीच राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला असून,
१९९९च्या प्रमाणे निवडणुकीनंतर दोन्ही कॉँग्रेसनीे एकत्रित येण्याचे समीकरण पाहायला मिळू शकते.
२००९च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीला केवळ तीनच जागा मिळाल्या होत्या. उर्वरित सात विधानसभा मतदारसंघांत पक्षाची केविलवाणी अवस्था झाली आहे. याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला बसला. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता संपुष्टात आली. निवडणुकीत संधी दिली तरच कार्यकर्ते व पक्ष जिवंत राहू शकतो. जिल्हा बॅँक, ‘गोकुळ’, बाजार समिती, साखर कारखाने या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते; पण जिल्हा बॅँकेवर गेली पाच वर्षे प्रशासक आहे.
‘गोकुळ’वर कॉँग्रेसची एकहाती सत्ता आहे. बाजार समितीवर प्रशासक आहे. ‘भोगावती’, ‘शरद’चा अपवाद वगळता सात मतदारसंघांत एकाही ठिकाणी साखर कारखाना राष्ट्रवादीचा नाही. अशा परिस्थितीत या मतदारसंघात राष्ट्रवादी जिवंत राहणार कशी? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहाही जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखविली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे पारंपरिक मित्रपक्ष जनसुराज्य व शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नेत्यांनी केली आहे.
स्वबळासाठी कॉँग्रेसमध्येही जोर
प्रत्येक वेळी धाकटा भाऊ मानून प्रामाणिकपणे मदत करायची आणि या धाकट्या भावाने मोठ्या भावालाच पायात पाय घालून तोंडावर पाडायचे, असे अनेक वेळा घडले आहे. म्हणूनच आता अशा आत्मघातकी भावासोबत राहण्यापेक्षा स्वतंत्रपणेच लढण्याची भूमिका पक्षनेतृत्वाने घ्यावी, या राज्यभरातील समस्त कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीला कोल्हापुरातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनीही जोर लावला आहे. काय व्हायचे ते होऊ द्या; पण आपलीही ताकद एकदा अजमावून पाहूया अशी कॉँग्रेस कार्यकर्त्यांची भावना पहायला मिळते.
महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांपासून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी आहे. या पंधरा वर्षांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना आलेला अनुभव फारसा चांगला नाही. राष्ट्रवादीचे नेते नेहमी कॉँग्रेस कार्यकर्त्यांशी दुजाभाव करतात. व्यक्तिगत फायद्यासाठी राष्ट्रवादीचे नेते कोणत्याही थराला जातात. त्याचा फटका कॉँग्रेसला बसतो, अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे.
गेल्या निवडणुकीत करवीरमध्ये पी. एन. पाटील, कोल्हापूर उत्तरमध्ये मालोजीराजे छत्रपती, हातकणंगलेमध्ये राजू आवळे, तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे यांचा पराभव का आणि कसा झाला याचा बारकाईने अभ्यास केला तर राष्ट्रवादीची भूमिका काय राहिली होती हे दिसून येईल, असे कॉँग्रेस कार्यकर्ते सांगतात. त्यातल्या त्यात पी. एन. पाटील व मालोजीराजे यांचा पराभव तर कॉँग्रेसला धक्कादायक राहिला होता. याउलट राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली होती. त्यामुळेच जर आपली ऐनवेळी फसवणूक होणार असेल, तर मग अशा सहकारी पक्षासोबत जायचेच कशाला, असा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी जाहीरपणे कॉँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, या मागणीचे समर्थन केले होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील कार्यकर्त्यांनीही तशीच मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादीशी असलेली आघाडी मोडून स्वबळावर लढण्याच्या मागणीचा दबाव पक्षनेतृत्वावर वाढत आहे. जिल्ह्याचा विचार केला, तर विधानसभेच्या दहाही मतदारसंघांत कॉँग्रेसकडे स्वत:चे ताकदीचे उमेदवार असल्याचा दावा केला जातो. मात्र, काही जुने जाणकार कार्यकर्ते मात्र कॉँग्रेसने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोकसभेत जी अवस्था झाली, तिचा समजूतदारपणे विचार केला पाहिजे, अशी सूचना करतात.

Web Title: First wrestling, then friendship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.