यंत्रमाग उद्योगातील मंदीचा पहिला बळी
By Admin | Updated: July 26, 2016 00:18 IST2016-07-26T00:16:58+5:302016-07-26T00:18:53+5:30
वस्त्रनगरीतील उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी : शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष

यंत्रमाग उद्योगातील मंदीचा पहिला बळी
इचलकरंजी : गेल्या वर्षभरात यंत्रमाग उद्योगात असलेल्या आर्थिक मंदीची झळ पोहोचलेल्या एका यंत्रमाग कारखानदाराने सोमवारी आत्महत्या केल्याने वस्त्रनगरीत जोरदार खळबळ उडाली. राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या यंत्रमाग उद्योगासमोरील समस्यांकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा पहिला बळी ठरल्याची चर्चा शहरात आहे. आता तरी सरकार जागे होईल का, असाही प्रश्न येथे विचारला जात आहे.वर्षभर यंत्रमाग उद्योगामध्ये कापडाला मागणी नसल्यामुळे आर्थिक मंदी जाणवत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने कापड खरेदी केली जात आहे. मात्र, यंत्रमागावर उत्पादन होणारा सर्वच कापड मालाला उठाव नाही. अशा काहीशा विचित्र परिस्थितीमध्ये यंत्रमाग उद्योग अडकला आहे. त्यामुळे राज्यातील विविध यंत्रमाग केंद्रांमधील यंत्रमागधारकांच्या संघटना या समस्यांची सोडवणूक शासन स्तरावर व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्रात वस्त्रोद्योगामध्ये साधारणपणे एक कोटी जनतेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने या उद्योगासाठी संजीवनी देणारी पॅकेज योजना हाती घ्यावी, अशी आग्रहाची मागणी यंत्रमागधारक संघटनांची आहे. कापडाची निर्यात होण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे. त्याचबरोबर चीन देशातून आयात होणाऱ्या कमी भावाच्या कापडावर बंदी आणावी. यंत्रमागधारकांनी कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या अर्थसहाय्यावर व्याजाचे अनुदान द्यावे. वीज दराची सवलत देण्याबरोबरच किमान वर्षभर विजेचे दर स्थिर राहावेत, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करूनसुद्धा शासन दरबारी अद्याप तरी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.
अशा पार्श्वभूमीवर खर्चीवाले पद्धतीने (जॉब वर्क) कापड व्यापाऱ्यांना कापड विणून देणाऱ्या यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घट केली. किमान साडेसहा पैसे प्रतिमीटर आवश्यक असलेली मजुरी अवघ्या चार पैशांवर आली आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखान्यात कारखानदाराने स्वत: काम करूनसुद्धा दैनंदिन नुकसान होत आहे. आज नाही उद्या उद्योगधंद्यामध्ये सुधारणा होईल, या आशेने यंत्रमाग उद्योग चालविले जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस गडद होणाऱ्या आर्थिक मंदीमुळे यंत्रमाग कारखानदारांना लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता काही प्रमाणावर सुरू असलेले यंत्रमाग कारखाने पुढील महिन्यापासून बंद पडू लागतील, अशीही भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
चौकट
यंत्रमाग कारखानदारांनी संघर्ष करावा : महाजन
यंत्रमाग उद्योगाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सवलतीच्या वीज दराबाबत अस्थिरता आणून शासनाने खेळखंडोबा केला, अशी प्रतिक्रिया यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यंत्रमाग कारखानदारांनीसुद्धा संघर्ष करायला शिकले पाहिजे. उत्पादनात घट आणून होणारे नुकसान कमीत-कमी होईल, याची दक्षता घेण्याबरोबरच स्वत:ची आर्थिक क्षमता वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला तर कारखानदारांवर आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही.