कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावातील दोन कुटुंबांमध्ये रविवारी जमिनीचा वाद उफाळला. या वादात वडील आणि मुलाला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. एका कुटुंबाने हवेत गोळीबार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी अजित आबासाहेब पाटील (वय ६५) यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगा अक्षय यालाही मारहाण करण्यात आली आहे. अजित पाटील यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीपीआर पोलिस चौकीत या प्रकरणाची नोंद झाली आहे.तसेच त्यांचा मुलगा अक्षय पाटील यांनाही मारहाण झाली. या घटनेमध्ये हवेत गोळीबार झाल्याचेही जखमींच्या नातेवाइकांनी सांगितले. आज रात्री ९ वाजता हा प्रकार घडला, याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.सीपीआरमध्ये जमा झालेल्या जखमींच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, राशिवडे गावातील विहीर नावाच्या ४२ गुंठे जमिनीवरून अजित आणि त्यांचे मोठे भाऊ केशव आबासाहेब पाटील (वय ७०) यांच्यामध्ये वाद आहे. याच कारणावरून रविवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबांत वादावादी झाली. त्यातून भांडण पेटले. यावेळी केशव आणि इतर चार ते पाच जणांनी अजित तसेच त्यांचा मुलगा अक्षय यांना दगडाने मारहाण केली. डोक्यात दगड लागल्याने अजित गंभीर जखमी झाले. अक्षय यांनाही काठीने मारहाण करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणात एका कुटुंबाकडून हवेत गोळीबार झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मात्र, याची सविस्तर माहिती मिळाली नाही. जखमींवर रात्री उशिरा सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत राधानगरी पोलिस ठाण्यात सुरू होते.
Kolhapur: जमिनीचा वाद उफाळला, हवेत गोळीबार केला; मारहाणीत एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:39 AM