स्वत: चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:59 IST2020-08-29T17:48:03+5:302020-08-29T17:59:54+5:30
सध्या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.

स्वत: चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट : फडणवीस
कोल्हापूर : सध्या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
फडणवीस यांनी शनिवारी दुपारी कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.
उद्धव ठाकरे यांनी बिगर-भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीवेळी मोदी यांच्याविरोधी भूमिका मांडली. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, सध्याचे सरकार स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे.
उलट पीएम केअर फंडातून वैद्यकीय उपकरणांसाठी सर्वाधिक निधी महाराष्ट्राला देण्यात आला आहे; परंतु हा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. सुशांत प्रकरणीही आम्हांला ओढण्याचा प्रयत्न आहे. तोदेखील अकार्यक्षम कारभारावरून लक्ष हटवण्यासाठीच आहे. आम्हांला सध्या कोरोनाविरुद्धची लढाई महत्त्वाची आहे.
अलमट्टीप्रश्नी आता महाराष्ट्राने खंबीर भूमिका घ्यावी. आम्ही त्यांच्यासमवेत आहोत; कारण उंची वाढवल्यामुळे काय परिणाम होतील हे आपल्याला गेल्यावर्षीच कळून चुकले आहे, असेही ते म्हणाले.
लढाई मोदींशी नाही, कोरोनाशी आहे
बिगरभाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता, ह्यलढायचं की नाही हे एकदा ठरवा,ह्ण असे विधान केले होते. याबाबत विचारण केली असता फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या हे कोणीतरी लक्षात आणून दिले पाहिजे की, आपली लढाई कोरोनाशी सुरू आहे. ती नीट लढली पाहिजे. लढाई मोदी यांच्याशी नाही.