कुटुंबातील पहिल्या साक्षर विद्यार्थ्याला आर्थिक पाठबळ
By Admin | Updated: April 8, 2015 23:59 IST2015-04-08T23:48:34+5:302015-04-08T23:59:10+5:30
विद्यापीठाचा उपक्रम : आरती पाटणकर पारितोषिकाने प्रारंभ

कुटुंबातील पहिल्या साक्षर विद्यार्थ्याला आर्थिक पाठबळ
संतोष मिठारी-कोल्हापूर -कुटुंबाच्या आर्थिक, तसेच अन्य परिस्थितीमुळे काही पिढ्यांना शिक्षणच मिळालेले नसते. अशा कुटुंबांतून जिद्दीने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या निधीतून पारितोषिकांच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे.‘ग्रामीण विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुर्गम खेड्या-पाड्यांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. कुटुंबांत काही पिढ्यांना शिक्षणाची ओळख नसतानाही ते साक्षर होतात; शिवाय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवेशित होतात. प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांना पुस्तके, प्रवेश शुल्कासाठी पैशांची जुळवाजुळव करताना अनेकदा कसरत करावी लागते. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना पारितोषिकांच्या माध्यमातून यावर्षीपासून विद्यापीठ आर्थिक मदत करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष (बी. ई. फायनल इन कॉम्प्युटर सायन्स) सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीला आरती पाटणकर परितोषिक देऊन होणार आहे.
अर्जात यंदा बदल
पहिल्या पिढीतील साक्षर विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती संकलित करण्यासाठी यावर्षीपासून विद्यापीठाच्या सर्वच प्रवेश अर्जात बदल केला जाणार आहे. अर्जात पहिल्या पिढीतील अथवा दुसऱ्या पिढीतील साक्षर आहात का? असे दोन रकाने असणार आहेत. त्याद्वारे माहिती संकलित करून या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
वर्षाकाठी पावणेतीन लाखांचे वितरण
देशाच्या कानाकोपऱ्यांतील २०२ व्यक्ती, संस्था असे देणगीदार दरवर्षी शिवाजी विद्यापीठातील ३५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पारितोषिकांच्या माध्यमातून बळ देत आहेत. या पारितोषिकांच्या माध्यमातून वर्षाकाठी पावणेतीन लाखांच्या रकमेचे वितरण केले जाते. गेल्या ४९ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
काही व्यक्ती, संस्था पारितोषिकांसाठी विद्यापीठाला देणगी देतात. अशा देणगीदारांना या नव्या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली जाणार आहे. त्यानुसार त्याची सुरुवात आरती पाटणकर पारितोषिकाने झाली आहे. - डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ