उद्धव गोडसेकोल्हापूर : कोरोनानंतर आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांचे पेव फुटले होते. त्यामुळे २०२३ मध्ये जिल्ह्यात फसवणुकीचे १३५२ गुन्हे नोंद झाले होते. पोलिसांच्या कारवाया आणि प्रसार माध्यमांनी केलेल्या प्रबोधनामुळे या गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. गेल्या वर्षी फसवणुकीचे २०१ गुन्हे दाखल झाले मात्र, ए. एस. ट्रेडर्सपासून सान्विकपर्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यांचे तपास अजूनही रखडलेले आहेत.शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सी यांसह विविध क्षेत्रांत गुंतवणूक करून त्यावर कमी वेळेत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या शेकडो कंपन्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला होता. मोठ्या हॉटेल्समधील सेमिनार, पार्टी, सहल, आकर्षक बक्षिसे आणि कमिशन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. सुरुवातीला चांगला परतावा मिळाल्याने अनेकांनी अशा बोगस कंपन्यांमध्ये लाखो रुपये गुंतवले. त्यानंतर काही महिन्यांत कोट्यवधी रुपयांची माया जमवून अनेक कंपन्यांनी गाशा गुंडाळला. परतावा आणि मुद्दलही अडकल्याने अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे २०२३ मध्ये जिल्ह्यात फसवणुकीचे १३५२ गुन्हे नोंद झाले होते.
फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांनी गेल्या वर्षभरात बोगस कंपन्यांच्या विरोधात विशेष अभियान राबवले. शाहूपुरी परिसरातील हॉटेल्स, कार्यालयांमध्ये होणाऱ्या सेमिनार्सवर नजर ठेवली. गुंतवणूक घेणाऱ्या कंपन्यांना नोटिसा पाठवल्या. दाखल गुन्ह्यातील काही संशयितांना अटक केली. त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या. काही गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल केले. प्रसार माध्यमांनीही याबाबत प्रबोधन केल्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार घटले आहेत. २०२४ मध्ये जिल्ह्यात २०१ गुन्हे दाखल झाले.
गुन्हे दाखल; पण तपास कधी?
सान्विक ट्रेडिंग, निवारा ट्रस्ट, मेकर ॲग्रो यासह हुपरीतील राजेंद्र नेर्लेकर याने जादा परतावा देण्याच्या आमिषाने केलेल्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही तपास पुढे गेलेला नाही. ए.एस. ट्रेडर्स, ई स्टोअर्स, वेल्थ शेअर, क्रिप्टो करन्सीच्या गुन्ह्यांचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे.
वर्ष - गुन्हे२०२३ - १३५२२०२४ - २०१घट - ११५०
कोट्यवधी रुपये अडकलेए. एस. ट्रेडर्ससह अनेक कंपन्यांमध्ये कोल्हापूरकरांचे सुमारे एक हजार कोटी रुपये अडकले आहेत. अजूनही पैसे परत मिळतील अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे त्यांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या गुन्ह्यांचे तपास कधी होणार?आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा - ए.एस. ट्रेडर्स, मेकर ॲग्रो, क्रिप्टो करन्सी, राजेंद्र नेर्लेकर - हुपरीशाहूपुरी पोलिस ठाणे - निवारा ट्रस्ट, ई-स्टोअर्सगांधीनगर - क्रिप्टो करन्सी फसवणूकइचलकरंजी - कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक, क्रिप्टो करन्सी फसवणूक