Kolhapur: शेतकरी संघाला आर्थिक मदत हा तात्पुरता दिलासा, मार्केटिंगचे नवतंत्रज्ञान अवलंबण्याची गरज
By राजाराम लोंढे | Updated: January 7, 2025 13:21 IST2025-01-07T13:20:50+5:302025-01-07T13:21:17+5:30
संघाचा खर्च म्हणजे म्हशीपेक्षा रेडकू मोठे

Kolhapur: शेतकरी संघाला आर्थिक मदत हा तात्पुरता दिलासा, मार्केटिंगचे नवतंत्रज्ञान अवलंबण्याची गरज
राजाराम लोंढे
कोल्हापूर : शेतकरी संघ नोव्हेंबर २०२४ अखेर १९ कोटीने तोट्यात आहे. जिल्हा बँकेसह इतर वित्तीय संस्थांकडून व्यवसायासाठी सुमारे दोन कोटी रुपये अर्थसहाय मागणी केली असली तरी अशा प्रकारची मदत म्हणजे आजचे मरण उद्यावर एवढेच होणार आहे. संघाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढायचे झाल्यास व्यवस्थापनाला शिस्त लावण्याची गरज आहे. परंतु नेतेमंडळी नेमके तेच न करता कुणालाही न दुखावण्याचे त्यांचे धोरण आहे. त्याचाच फटका संघ गर्तेत जायला बसत आहे. नोव्हेंबर २०२४ अखेर संघ १९ कोटीने तोट्यात आहे. त्यामुळे पारंपरिक मार्केटिंगची पद्धत बदलून ग्राहकांच्या गरजा ओळखून नव्याने विश्वास निर्माण करण्याचे आव्हान संघाच्या संचालक मंडळावर राहणार आहे.
काही मंडळींच्या चुकीच्या कारभारामुळे संघ अडचणीत आला, पण आता संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. संघ वाचला तरच तुमच्या खुर्च्या वाचणार आहेत, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे. यासाठी उच्चशिक्षित व मार्केटिंगचे ज्ञान असणाऱ्या कार्यकारी संचालकाची नेमणूक करून संचालकांनी निस्वार्थीपणे काम करायला हवे. नेत्यांनी एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश संचालकांना दिले होते. पण, अद्याप त्यांची नेमणूकही केलेली नाही. संचालक मंडळातील अंतर्गत हेवे-दाव्यांसह इतर गोष्टींतील रस कमी करून हा संघ वाचवण्याचे शिवधनुष्य संचालकांना घ्यावे लागेल. एकीकडे सर्व शाखा नफ्यात आणण्याबरोबरच संचित तोटा कमी करण्याचे आव्हान असणार आहे.
संघाचा खर्च म्हणजे म्हशीपेक्षा रेडकू मोठे
एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा ताळेबंद पाहिला तर आठ महिन्यांत संघाचे उत्पन्न ७ कोटी ८ लाख रुपये तर खर्च ७ कोटी २८ लाख रुपये झाला आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा २० लाखाने खर्च वाढला आहे. यावरून, संघाची आगामी काळातील दिशा स्पष्ट होते. मागील वर्षी म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत तब्बल १० कोटीने व्यवसाय कमी झाला आहे.
संघ बाहेर काढण्यासाठी हे करा..
- तातडीने भागभांडवल उपलब्ध करून माल खरेदी करणे
- बाजारपेठेतील चढ उताराचा अंदाज घेऊन खरेदी-विक्री करावी.
- कोट्यवधीची उधारी वसुलीला संचालकांनी प्राधान्य द्यावे
- अपहाराच्या रकमा वसुलीबाबत ‘नरोबा कुंजरोवा‘ची भूमिका सोडली पाहिजे
- शाखांनिहाय पुरेसे कर्मचारी देत असताना त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण द्यावे.
- ग्राहकांना विश्वास देऊन उत्पन्नात वाढ आणि खर्चाला कात्री लावण्याची गरज
संघाच्या जागा विकसित करण्याची गरज
स्वर्गीय बाबा नेसरीकर यांनी संघाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी विविध विभाग सुरू केले. व्यापारात कधीही एखादा विभाग अडचणीत येतो, त्यावेळी इतर विभागांनी सावरायचे असते. ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. संघाच्या मालकीच्या १४ गोडाउनसह इतर जागा आहेत. तिथे स्वत:चा व्यवसाय सुरू केला, तर उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते.
दृष्टीक्षेपात शेतकरी संघाची नोव्हेंबर २०२४ अखेर आर्थिक स्थिती -
- कर्ज देणे - ५.६५ कोटी
- व्यापारी देणे - ३.०२ कोटी
- ठेव देणे - १.२३ कोटी
- बिल्स देणे - ०.२० कोटी
- सिक्युरिटी डिपॉझिट देणे - ०.४९ कोटी
- बिल्स कोर्ट दावा येणे - १.३० कोटी
- बिल्स इतर येणे - २.६७ कोटी
- व्यापारी येणे - ०.८० कोटी
- चालू तोटा - ०.१९ कोटी
- संचित तोटा - ३.८१ कोटी