अखेर शिंगणापूर मार्गावरील कचरा हटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:36+5:302021-05-08T04:25:36+5:30
कोल्हापूर : शिंगणापूर रोडवर खांडसरी ते वृद्धाश्रम दरम्यानच्या रस्त्याकडेला गेले चार-पाच महिने अस्ताव्यस्त पसरलेला दुर्गंधीयुक्त कचरा शुक्रवारी महापालिकेने उचलला. ...

अखेर शिंगणापूर मार्गावरील कचरा हटविला
कोल्हापूर : शिंगणापूर रोडवर खांडसरी ते वृद्धाश्रम दरम्यानच्या रस्त्याकडेला गेले चार-पाच महिने अस्ताव्यस्त पसरलेला दुर्गंधीयुक्त कचरा शुक्रवारी महापालिकेने उचलला. आठ ते दहा ट्रॉली भरून तो कसबा बावडा येथील झूम प्रकल्पावर नेण्यात आला. कचऱ्यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी नि:श्वास सोडला.
फुुलेवाडी जकात नाक्यापासून शिंगणापूर मार्गावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूला मोठ्या संख्येने घरगुती कचरा काही महिने पसरला होता. शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी या तीन गावांच्या ग्रामस्थांनी रस्त्याकडेला हा कचरा टाकल्याचे नागरिकांनी सांगितले. खांडसरी ते मातोश्री वृद्धाश्रम दरम्यान रस्त्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य झाले होते. याच मार्गावरून शहरात रोज हजारो नागरिक ये-जा करतात. त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कचऱ्यामुळे येथे भटक्या कुत्र्यांचा उच्छांद मांडलेला असतोच. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. चार दिवसांपूर्वी कचरा उठावसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय तायशेटे, संतोष मोरे, ऋतुराज गवळी, वरद अतिग्रे, योगेश कांबळे, शुभम बारमल, आदींनी महापालिका आरोग्याधिकारी डॉ. जयवंत पवार यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
शुक्रवारी महापालिकेच्या यंत्रणेने येऊन हा कचरा उठाव केला. सुमारे आठ ते दहा ट्रॉली कचरा उठाव करून तो झूम प्रकल्पावर नेण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोट..
गेले चार-पाच महिने या कचऱ्यामुळे भागात दुर्गंधी पसरली होती. तो उठाव करण्यासाठी कोणीही दखल घेत नव्हते. दुर्गंधीचा व भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास होता. कचरा उठाव केल्यामुळे प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. - संदीप पाटील,नागरिक.
फोटो नं.०७०५२०२१-कोल- शिंगणापूर०१,०२ (कोलडेस्कवर)
ओळ : शिंगणापूर मार्गावर खांडसरी ते मातोश्री वृद्धाश्रम दरम्यान रस्त्याकडेला गेले चार महिने साचून राहिलेला कचरा महापालिकेने शुक्रवारी उठाव केला.