अंतर्गत डागडुजी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: July 17, 2014 00:19 IST2014-07-17T00:03:31+5:302014-07-17T00:19:28+5:30

केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभिकरण : खासबागच्या लॉनचे काम सुरू

The final stage of internal repair | अंतर्गत डागडुजी अंतिम टप्प्यात

अंतर्गत डागडुजी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : हेरिटेज वास्तू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची अंतर्गत डागडुजी, कॅटवॉक रॅम्प, मंडपी तसेच इमारतीच्या भिंतींच्या मजबुतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, तर खासबाग मैदानात लॉनची लागवड सुरू आहे.
राज्य शासनाने दिलेल्या १० कोटींच्या निधीत केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. नाट्यगृहाची इमारत शाहूकालीन असल्याने गेले काही महिने फक्त नाट्यगृहाच्या भिंतींच्या मजबुतीकरणाचे काम सुरू होते. त्यासह इमारतीची गळती काढणे, जुन्या पत्र्यांच्या संवर्धनासाठी त्यावर अँटी पेंट करणे, नवीन कौले-पत्रे टाकणे, वास्तूला गिलावा करणे अशी अंतर्गत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या कॉरिडॉर तसेच कॅटवॉक, मंडपी यांचीही कामे पूर्ण झाली असून बाल्कनीचे काम सध्या सुरू आहे तर साऊंड सिस्टीमसाठी येत्या काही दिवसांत टेंडर काढण्यात येणार आहे.
खासबाग मैदान आणि नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम वर्षभरात संपवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार मैदानाचे काम वेळेत पूर्ण होईल. मात्र, नाट्यगृहाची इमारत हेरिटेजमध्ये असल्याने हे काम अत्यंत सावधगिरीने करावे लागत आहे. या कामासाठी वेळ लागत असला तरी आम्ही ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकारी अनुराधा वांडरे यांनी दिली.

Web Title: The final stage of internal repair