The final session examination will be held on the syllabus till March 13 | अंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणार

अंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणार

ठळक मुद्देअंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणारशिवाजी विद्यापीठाचा निर्णय : पुनर्मूल्यांकनाची सुविधा नाही

कोल्हापूर : अंतिम सत्राच्या नियमित, पुन:परीक्षार्थी, अनुशेषित (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १३ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर होणार आहेत. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही. त्याबाबतचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे.

अंतिम पूर्व वर्ष अथवा सत्राच्या पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा या संपूर्ण १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत. त्यांचे स्वरूपही एमसीक्यू असणार आहे. परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी ऑफलाईनचा पर्याय निवडतील, त्यांच्यासाठी ओएमआर शीटचा वापर करून महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणक प्रणालीमार्फत आपोआप वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही आपोआप सेव्ह होऊन खंड पडला तेथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. पी. जी. डिप्लोमा, डिप्लोमा सर्टिफिकेट पद्धतीच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा या विद्यापीठाच्या प्रणालीमधून घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.

विद्यार्थ्यांनी निकालाची खातरजमा करावी

विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे परीक्षा अर्ज सादर केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष अथवा अंतिम सत्र वगळता निकाल जाहीर करण्यात येत आहेत. हे निकाल जाहीर करताना, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने पारित केलेल्या निर्णयानुसार या कार्यवाहीबाबतचे अध्यादेश पारित करण्यात आले असल्याची माहिती पळसे यांनी दिली.

चुकीच्या निकषाने पदवीचे हजारो विद्यार्थी अनुत्तीर्ण हे वृत्त लोकमतच्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यात प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालीतील त्रुटी मांडल्या होत्या. त्यावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बुधवार खुलासा केला आहे. त्यामध्ये परीक्षा विभागाकडून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निकाल जाहीर केले आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपले जाहीर झालेले निकाल तपासावेत. या संदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास महाविद्यालय स्तरावर दाखवून त्याची खातरजमा करावी, असे म्हटले आहे.

 

Web Title: The final session examination will be held on the syllabus till March 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.