चित्रपटसृष्टीने नव्या मनोरंजन युगाशी जोडले पाहिजे-चर्चासत्रात मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:53 AM2019-12-04T11:53:53+5:302019-12-04T11:56:13+5:30

स्मार्ट फोनसारख्या माध्यमांमुळे मनोरंजन आता प्रत्येकाच्या हातात आले आहे. वेब सिरीज, यू ट्यूब, मालिका, ट्रेलर, परदेशी सिरीयल, प्राईम व्हिडीओ, बातम्या, व्हॉटस् अ‍ॅप असे आधुनिक तंत्रज्ञान आणि काळानुरूप बदलणाऱ्या मनोरंजनाच्या माध्यमांची आव्हाने चित्रपटसृष्टीपुढे आहेत, त्यावर मात करायची असेल, तर चित्रपटसृष्टीनेही या युगाशी स्वत:ला जोडले पाहिजे, तरच या क्षेत्राचा आक्रमकतेने येणाऱ्या मनोरंजन माध्यमांपुढे टिकाव लागेल, असे मत चित्रपटसृष्टीतील अभिनेते व जाणकारांनी व्यक्त केले.

Filmmaking should connect with the new entertainment age - the opinions of dignitaries at the seminar | चित्रपटसृष्टीने नव्या मनोरंजन युगाशी जोडले पाहिजे-चर्चासत्रात मान्यवरांचे मत

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात अभिनेता भरत जाधव यांनी मत व्यक्त केले. यावेळी उमेश बोळके, कविता गगराणी, सौमित्र पोटे, स्वप्निल राजशेखर, चारुदत्त जोशी, निखिल साने, सुनील फडतरे उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देचित्रपटसृष्टीने नव्या मनोरंजन युगाशी जोडले पाहिजे-चर्चासत्रात मान्यवरांचे मतकोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा

कोल्हापूर : स्मार्ट फोनसारख्या माध्यमांमुळे मनोरंजन आता प्रत्येकाच्या हातात आले आहे. वेब सिरीज, यू ट्यूब, मालिका, ट्रेलर, परदेशी सिरीयल, प्राईम व्हिडीओ, बातम्या, व्हॉटस् अ‍ॅप असे आधुनिक तंत्रज्ञान आणि काळानुरूप बदलणाऱ्या मनोरंजनाच्या माध्यमांची आव्हाने चित्रपटसृष्टीपुढे आहेत, त्यावर मात करायची असेल, तर चित्रपटसृष्टीनेही या युगाशी स्वत:ला जोडले पाहिजे, तरच या क्षेत्राचा आक्रमकतेने येणाऱ्या मनोरंजन माध्यमांपुढे टिकाव लागेल, असे मत चित्रपटसृष्टीतील अभिनेते व जाणकारांनी व्यक्त केले.

शाहू स्मारक भवनात मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्यांतर्गत आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी मत नोंदविले. यात कलर्सचे चॅनेलप्रमुख निखिल साने, अभिनेता भरत जाधव, स्वप्निल राजशेखर, आनंद काळे, उमेश बोळके, चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गगराणी, पत्रकार सौमित्र पोटे यांनी सहभाग घेतला.

यावेळी निखिल साने म्हणाले, ‘मनोरंजनाचं जग वेगाने बदलत आहे. टीव्हीसमोर बसणारा वर्ग वेगळा आहे. आताची पिढी मोबाईलवर वेब सिरीज, यू ट्यूब, मालिका, ट्रेलर, परदेशी सिरीयल, प्राईम व्हिडीओ अशा माध्यमांना प्राधान्य देते. त्यांना जगभरातील माध्यमांचे भान आहे. एखाद्या चित्रपटाची अथवा मालिकेची निर्मिती, कथानक आणि अपेक्षित प्रेक्षक यावर त्याचे अर्थकारण ठरत असते.

भरत जाधव म्हणाले, ‘मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमाची परिभाषा वेगळी असते. पूर्वी लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत होते, आता सगळं मोबाईलवर उपलब्ध आहे. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यामुळे चित्रपटांचा कौटुंबिक प्रेक्षक कमी झाला आहे.

स्वप्निल राजशेखर म्हणाले, ‘मनोरंजनाच्या क्षेत्रात कोल्हापूरचा शिक्का असणं हे दुधारी तलवारीसारखं आहे, त्याचा फायदा होतो तसाच तोटाही होतो; त्यामुळे कलाकारांनी शुद्ध मराठी, हिंदी, इंग्रजीसह प्रादेशिक भाषांचा अभ्यास केला पाहिजे, गुणवत्तेत वाढ केली पाहिजे. त्यात कोल्हापुरी टोन येऊ न देता आपली भूमिका निभावता आली पाहिजे.
आनंद काळे म्हणाले, ‘चित्रपटनिर्मिती अथवा मालिकांसाठी मुंबईनंतर कोल्हापूरचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर वेब सिरीज, अ‍ॅनिमेशन, लघुपटसारख्या क्षेत्रातही येथील मुलं मोठ्या संख्येने काम करत आहेत. क्षमता असली की ग्रामीण भागातील मुलेही वेगाने पुढे येतात.’

कविता गगराणी म्हणाल्या, संस्थानकाळाचा चित्रपटांना राजाश्रय मिळाला, पुढे लोकाश्रय मिळाला. आता कोल्हापुरात चित्रपट निर्मिती होत नसली तरी स्टुडिओ आणि अनुभवाच्या जोरावर पुन्हा येथे चित्रपट व्यवसाय स्थिरावू शकतो.

सौमित्र पोटे यांनी कोल्हापुरात नैसर्गिक लोकेशन खूप असल्याने प्रत्यक्ष स्टुडिओत चित्रीकरणाचे प्रमाण कमी असेल, असे मत व्यक्त केले. चारुदत्त जोशी यांनी निवेदन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अभिनेत्री उषा नाईक, हेमसुवर्णा मिरजकर, माला इनामदार, माधवी जाधव, सुरेखा शहा, एन. रेळेकर, सदानंद सूर्यवंशी, शाम काने, रमेश स्वामी, अशोक काकडे, कृष्णा पोवार यांच्यासह चित्रपट व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापुरातील क्षमतेला हवी आधुनिकतेची जोड

कोल्हापूरने चित्रपटसृष्टीला भरभरून इतिहास दिला आहे. आपल्या जुन्या पिढीने खूप काही करून ठेवले आहे. मध्यंतरीचा काळ कोल्हापूरसाठी खडतर असला तरी अजूनही येथील तरुणाईमध्ये चित्रपट निर्मितीचे वेड आहे; त्यामुळेच अनेकजण पडद्यावर व पडद्यामागे कार्यरत आहेत. नैसर्गिक लोकेशन, परंपरेच्या पाऊलखुणा, चित्रनगरीसारखा स्टुडिओ, कलाकार, तंत्रज्ञांची फळी आणि अनुभव एवढ्या सगळ्या क्षमता असलेल्या कोल्हापुरात चित्रपट-मालिका व्यावसायिकांच्या गरजांनुसार सोईसुविधा मिळवून दिल्या तर मुंबईनंतर चित्रपट नगरी म्हणून कोल्हापूर पुन्हा पुढे येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

 

Web Title: Filmmaking should connect with the new entertainment age - the opinions of dignitaries at the seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.