गटबाजी संपली, ‘धनुष्यबाण’ एकच गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:45+5:302021-02-05T07:16:45+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेत असणारी गटबाजी संपली असून धनुष्यबाण हा एकच गट राहिला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका ...

गटबाजी संपली, ‘धनुष्यबाण’ एकच गट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेत असणारी गटबाजी संपली असून धनुष्यबाण हा एकच गट राहिला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे किमान तीस नगरसेवक निवडून येतील आणि शिवसेनेचाच महापौर होईल, असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
महानगरपालिकेच्या सर्वच निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रचारात आघाडी घेतात, परंतु शेवटच्या दोन-तीन दिवसांत पैशांच्या राजकारणात मागे पडतात. त्यामुळे संख्याबळ वाढत नाही. पण आता राज्यात आम्ही सत्तेत आहोत. मुख्यमंत्री तसेच नगरविकास खात्याचे मंत्री आमच्या पक्षाचे आहेत. त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद या राजकारणातील आयुधांचा पूर्ण क्षमतेने वापर करेल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
शिवसेना स्वाभिमानी पक्ष आहे. त्यामुळे महाआघाडीतील सहकारी पक्षांनी जर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर आम्हीही बिलकूल तडजोड करणार नाही. आम्हीदेखील स्वतंत्र लढू आणि शिवसेनेचा महापौर करू, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
विकासकामांचे प्रस्ताव करण्याच्या सूचना
काेल्हापूर शहरातील विविध विकासकामांचे प्रस्ताव तातडीने करावेत आणि राज्य सरकारकडे पाठवावेत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही कामांची सुरुवात करून निवडणुकीस सामोरे जाऊ, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
त्यांचा कार्यक्रम आम्ही करू
लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार असतो. त्यामुळे ‘आमच्या विरोधात गेल्यास त्यांचा कार्यक्रम करू’ अशा भाषेत इच्छुकांना धमकावणाऱ्यांच्या विरोधात शिवसेना ताकदीने लढेल. या निवडणुकीत आम्हीच त्यांचा कार्यक्रम करू, असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला.
माझा पराभव माझ्या चुकीमुळे
विधानसभा निवडणुकीत माझा झालेला पराभव हा गटबाजी, धोकेबाजीमुळे झालेला नाही तर माझ्या हातून झालेल्या काही चुकांमुळे झाला असल्याची कबुली क्षीरसागर यांनी यावेळी दिली. सगळ्याच आंदोलनात आपण भाग घ्यायचा नसतो हे आता पराभवातून कळाले. परंतु जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर आपण सदैव लढत राहू, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह माजी नगरसेवक नियाजखान, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, इच्छुक उमेदवार ऋुतुराज क्षीरसागर, नंदकुमार मोरे, सरिता मोरे, तेजस्विनी इंगवले, राजू हुंबे, स्नेहल चव्हाण, ज्योती निलेश हंकारे, रवी चौगुले, जयवंत हारुगले, अभिषेक देवणे, अजित मोरे, सुनील जाधव, रणजित मिणचेकर उपस्थित होते.