लढा हेच माझ्या आयुष्याचे खरे ‘टॉनिक’, पुन्हा सज्ज

By Admin | Updated: February 8, 2015 01:09 IST2015-02-08T01:09:31+5:302015-02-08T01:09:31+5:30

एन. डी. पाटील यांच्या भावना : हृदयशस्त्रक्रियेनंतर कोल्हापुरात घरी परतले, कार्यकर्त्यांकडून स्वागत

The fight is the real tonic of my life, ready again | लढा हेच माझ्या आयुष्याचे खरे ‘टॉनिक’, पुन्हा सज्ज

लढा हेच माझ्या आयुष्याचे खरे ‘टॉनिक’, पुन्हा सज्ज

कोल्हापूर : अरे, रुग्णालयातून उपचार घेऊन मी परतलो; परंतु लढा हेच माझ्या आयुष्यातील खरे औषध आहे. त्यामुळे आजपासून कोणत्याही लढ्यासाठी मी पुन्हा सज्ज आहे... अशा भावना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केल्या. प्रा. पाटील यांच्या आगमनाप्रीत्यर्थ लोकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. रुग्णालयातून उपचार करून घरी परतल्यावर एखाद्याचे अशा स्वरूपात स्वागत होण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा.
मुंबईत हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रा. पाटील यांचे दुपारी रुईकर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी सरोज पाटील होत्या. निवासस्थानाजवळ टोलविरोधी कृती समितीसह समाजातील मान्यवरांनी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रा. पाटील यांचे अभीष्टचिंतन केले व त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्रा. पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘सातत्याने विविध प्रश्नांवर लढा हेच माझे टॉनिक आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी प्रकृतीचा असाच त्रास झाला. मी रायगड जिल्ह्यात ‘रिलायन्स’ने विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. ३४ हजार शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या. त्यावेळी संघर्ष सुरू असताना माझे आजारपण पळून गेले. आताही तसेच आहे. आता मी ठणठणीत बरा आहे, काठी घेऊन चालताही येते. चळवळीत राहिलो तर तब्येत ठणठणीत राहते. टोल असो वा अन्य प्रश्नावर मी संघर्षास सज्ज आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तेच माझे संचित राहील.’
टोल समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, ‘एन. डी. पाटील हे चळवळीतील नेते आहेत. टोल आंदोलनाचा ते कणा आहेत. त्यांना चांगले आरोग्य लाभो, हीच भावना आहे.’
माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, बाबासाहेब देवकर, संभाजी जगदाळे, दीपा पाटील, सत्यजित कदम, अशोक पोवार, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, व्यंकाप्पा भोसले, विवेक कोरडे, अशोकराव पवार-पाटील, बाळासाहेब वरुटे, बाबासाहेब देवकर, प्रा. अशोक चव्हाण, प्रा. सुभाष पाटील, दिलीपकुमार जाधव, दिगंबर लोहार, भारत पाटील, बजरंग शेलार, अरुण सोनाळकर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेतली.

Web Title: The fight is the real tonic of my life, ready again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.