घरफाळा भरणाऱ्यांचा सत्कार; थकबाकीदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:02 IST2020-10-28T16:58:41+5:302020-10-28T17:02:50+5:30
CoronaVirus, muncipaltyCarportation, kolhapurnews प्रामाणिकपणे घरफाळा जमा करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार तर थकबाकीदारांवर कडक कारवाई, असा नवा फंडा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सुरू केला आहे.

घरफाळा भरणाऱ्यांचा सत्कार; थकबाकीदारांवर कारवाई
कोल्हापूर : प्रामाणिकपणे घरफाळा जमा करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार तर थकबाकीदारांवर कडक कारवाई, असा नवा फंडा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सुरू केला आहे.
वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून महापालिकेची देय रक्कम तत्काळ भरावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. महापालिकेच्या विविध विभागांचा वसुलीबाबत मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
मार्चची प्रतीक्षा करू नका
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने सर्व विभागप्रमुखांनी थकबाकी वसुलीचे काम प्रभावी करावे. मार्चअखेर वसुलीचे नियोजन आताच करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
आयुक्तांचे आदेश ..
- पाणीपुरवठा विभागाने नोटिसीची मुदत संपलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी विलंब न करता थेट कारवाई करावी.
- वसूल होणाऱ्या थकबाकीला प्राधान्य द्यावे,
- वसुली अडचणी येत असणाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये वसुली करा.
- सर्व विभागांनी वसुली वाढविण्याच्या दृष्टींने नियोजन करा, वसुलीत हयगय करू नये.
- वसुलीबाबत येथून पुढे दर आठवड्यास आढावा
पाच कोटी एलबीटी वसुलीचे नियोजन
स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेमध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही. मार्चपर्यंत शिबिर घेऊन ५ वसुली करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा विभागानेही झालेल्या वसुलीची माहिती दिली.
२६ हजार मिळकतींना नोटीस
घरफाळा विभागाने आजअखेर २९ कोटी ७३ लाखांची वसुली केली असून २६ हजार मिळकतदारांना नोटिसा बजावली आहे. पाच लाख व त्यावरील थकबाकीधारकांना नोटीस काढण्यात येत असून १५ हजार मिळकतधारकांनी ऑनलाईन घरफाळा भरला असल्याचे करनिर्धारक संजय भोसले यांनी सांगितले.