कोल्हापूर : एकीकडे एलपीजी गॅसच्या टंचाईने नागरिकांच्या रांगा थांबत नसताना आता पेट्रोल-डिझेलचीही टंचाई निर्माण होऊन लाॅकडाऊन लागण्याच्या अफवेचे पिक आज, मंगळवारी अचानक फोपावल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी उसळली. उन्हातान्हात पेट्रोलपंपांवर नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या आहेत. यामुळे पंपचालक व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे नागरिक भीतीने पेट्रोलचा साठा करत असल्याचे लक्षात आल्यानंतर एक किंवा दोनच लिटर पेट्रोल देण्याची भूमिका घेतली. मंगळवारी सकाळपासून पंपांवर उडालेली झुंबड रात्री उशिरापर्यंत होती.इराण-इस्त्राईल युद्धाच्या झळा भारतालाही बसत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने साथ दिली तशी साथ यापुढच्या काळातही द्या असे आवाहन केल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय याच शंकेने नागरिकांनी पंपांवर गर्दी करायला सुरुवात केली.
वाचा: 'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले
वाहनधारकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा आहे. डेपोतूनही मागणी तसा पुरवठा होत आहे. -अरविंद तराळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.