हसूरवाडी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-14T00:56:34+5:302014-07-14T00:59:11+5:30
दोघांना अटक : वैमनस्यातून चाकूने भोकसले

हसूरवाडी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला
गडहिंग्लज : हसूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सतीश शंकर आसबे (वय २०) या तरुणावर गावातीलच दोघा तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. पोटावर चाकूने भोसकून काठीने जबर मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती अत्यवस्थ असून, त्याच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी निखिल शिवगोंडा पाटील (२०) व रोशन रायगोंडा पाटील (१७) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हसूरवाडी येथील आसबे व पाटील यांच्यात पूर्वीपासून जमिनीच्या कारणावरून वाद आहे. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा प्रकार घडला आहे. काल, शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील मराठी शाळेसमोर निखिल याने सतीशच्या पोटावर चाकूने वार केले, तर रोशन याने काठीने त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.
सतीशचे वडील शंकर आसबे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)