सेवानिवृत्त कामगारांचा उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: January 19, 2015 00:28 IST2015-01-19T00:16:49+5:302015-01-19T00:28:05+5:30
गडहिंग्लज कारखाना : थकीत अंतिम पगार, ग्रॅच्युईटी, १८ टक्के वेतनवाढीतील फरकांची मागणी

सेवानिवृत्त कामगारांचा उपोषणाचा इशारा
गडहिंग्लज : थकीत अंतिम पगार, ग्रॅच्युईटी व १८टक्के वेतनवाढीतील फरक आदींच्या मागणीसाठी २ फेब्रुवारीपासून कुटुंबीयांसह कारखान्याच्या कार्यस्थळावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या बैठकीत झाला.साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी विजयसिंह देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महादेव मंदिरात ही बैठक झाली. कामगार प्रतिनिधी शशिकांत चोथे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे येथील ब्रीसक् फॅसिलिटीज प्रा. लि., कंपनीने सहयोग तत्त्वावर १० वर्षांच्या कराराने हा कारखाना चालवायला घेतला आहे. १ आॅक्टोबर २०१३ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम पगार, ग्रॅच्युईटी, १८टक्के वेतनवाढमधील वेतन व ग्रॅच्युईटी फरक व बँकेच्या, पतसंस्थेच्या कपाती थकीत आहेत. वेळावेळी मागणी करूनदेखील देय रकमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याचा आरोप कामगारांनी यावेळी केला. हक्काच्या पैशासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार कामगारांनी केला. बैठकीस चंद्रकांत बंदी, बंडोपंत पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, दत्ता मगदूम, अशोक येसरे, गणपती बडदारे, सदाशिव चव्हाण, दत्तात्रय शेवाळे, सुरेश बागडी, अशोक स्वामी आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)