नागपूर-रत्नागिरी मार्गाच्या बायपास रेखांकनास शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:28+5:302021-07-14T04:29:28+5:30
नागपूर-रत्नागिरी महामार्ग क्र. १६६ हा २०१७ च्या रेखांकनात केर्ली येथील वडगाव पाणंदमधून थेट कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडला जाणार होता. दरम्यान, ...

नागपूर-रत्नागिरी मार्गाच्या बायपास रेखांकनास शेतकऱ्यांचा विरोध
नागपूर-रत्नागिरी महामार्ग क्र. १६६ हा २०१७ च्या रेखांकनात केर्ली येथील वडगाव पाणंदमधून थेट कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडला जाणार होता. दरम्यान, परिसरातील राजकीय हस्तक्षेप आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पूर्वीचे रेखांकन रद्द केले. केर्ले गावाला बायपास आणि पर्यायी मार्ग म्हणून वडगाव पाणंद, हनुमान हायस्कूल (केर्ले)ते नलवडे बंगला (पडवळवाडी) असा साडेपाच किलोमीटरच्या रेखांकनाचा प्रस्ताव निश्चित केला. संबधित शेतकरी आणि नागरिकांनी बायपास रेखांकन रद्द होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाद मागितली होती; परंतु २१ जून २०२१ रोजी बायपासच्या अमान्य रेखांकनात शेतकऱ्यांनी अडथळा आणून रेखांकनाचे काम बंद पाडले. मंगळवारी सरकारी यंत्रणेने पूर्वकल्पना न देताच करवीर पोलिसांच्या फौजफाट्यासह मोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात दिवसभर रेखांकन चालू ठेवले. साडेपाच किलोमीटरच्या मार्गात येणारी दोनशे शेतकऱ्यांची शेकडो एकर बागायत जमीन, विहीर, कूपनलिका चाळीसहून अधिक पक्की घरे साडेपाच किलोमीटरच्या मार्गात जाणार आहे. त्यामुळे मोजणीच्या ठिकाणी महिला व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून नियोजित आराखडा बदण्याची विनंती प्रशासनास केली. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे न फिरकल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.
कोट : २०१७ च्या रेखांकन प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध व लोकप्रतिधींच्या हस्तक्षपामुळे जुने रेखांकन रद्द केले. त्याला पर्याय आणि केर्ले गावाला बायपास म्हणून नवीन रेखांकनाच्या पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने त्यानुसार रेखांकनाची प्रक्रिया सुरू आहे. रेखांकनात शेती, घरे जाणाऱ्यांना शासन नियमानुसार मोबदला मिळणार आहे.
-वसंत पंदरकर, प्रकल्प संचालक, कोल्हापूर
कोट-
राजकीय हस्तक्षेपामुळे पूर्वीच्या मोजणीत बदल करून बायपासची मोजणी आमच्यावर अन्यायकारक आहे. नियोजित महामार्गात आमची घरेदारे, शेती, जमीन जात असल्याने आम्ही रस्त्यावर येणार आहे. ही मोजणी पोलीस बंदोबस्तात बळाचा वापर करून करत आहेत.
-शिवाजी गायकवाड, शेतकरी, केर्ले