ताप कोंबड्यांना मरण शेतकऱ्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:09+5:302021-01-13T05:05:09+5:30
ताप कोंबड्यांना मरण शेतकऱ्यांचे अफवांनी जिल्ह्यातील चार हजार पोल्ट्रीधारक हडबडले : कोंबड्या फुकापासरी विकण्याची वेळ राजाराम लोंढे, लोकमत न्यूज ...

ताप कोंबड्यांना मरण शेतकऱ्यांचे
ताप कोंबड्यांना मरण शेतकऱ्यांचे
अफवांनी जिल्ह्यातील चार हजार पोल्ट्रीधारक हडबडले : कोंबड्या फुकापासरी विकण्याची वेळ
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बर्ड फ्लूमध्ये कोंबड्याने ताप येऊन त्या मृत्युमुखी पडतात हे जरी खरे असले तरी यामध्ये खरे मरण शेतकऱ्यांचे होते. कोरोनाच्या अफवेतून काहीसे सावरलेले पोल्ट्रीधारक आता बर्ड फ्लूच्या संकटाने पुरते हादरून गेले आहेत. कोंबड्या फुकापासरी विकाव्या लागत असल्याने पोल्ट्रीसाठी काढलेली लाखो रुपयांची कर्जे परत करायची कशी? या विवंचनेत जिल्ह्यातील चार हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत.
शेतीमालाच्या अनिश्चित विक्री व्यवस्थेमुळे शेतकरी दुधासह पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत. तीन-चार महिन्यांच्या संगोपनात चार पैसे चांगले मिळतात म्हणून जोखीम पत्करून शेतकरी याकडे वळले.
शेतकरी बॉयलर कोंबड्यांचे संगोपन करत असताना कडकनाथमधून त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणून त्याकडे शेतकरी वळले. बघता बघता कडकनाथचे फार्म झपाट्याने वाढले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यातून चांगले पैसेही मिळू लागले. मात्र, कंपनीनेच गंडा घातल्याने शेतकरीच उद्ध्वस्त झाला. कडकनाथ बंद करून शेतकरी पुन्हा बॉयलरकडे वळला. मात्र फेब्रवारी, मार्चमध्ये बॉयलर कोंबड्यांना पुन्हा कोरोनाशी जोडले गेले आणि या अफवेतून तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आताही बर्ड फ्लूची इतर राज्यांत लागण झाल्याची नुसती बातमी धडकली, पक्षी फुकापासरीने विकावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (पूर्वार्ध)
गल्लोगल्ली कोंबड्या विकण्याची वेळ
ग्राहकही अफवेला लगेच बळी पडतात. यामुळे भाजीपाला विक्री केला जातो, त्याप्रमाणे गल्लोगल्ली व आठवडी बाजारात कोंबड्या विकण्याची वेळ पोल्ट्रीधारकांवर आली आहे.
कोट-
गेल्या दोन वर्षांपासून पोल्ट्रीवर संकटे येत असल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- राजेंद्र जाधव (पोल्ट्रीधारक, राधानगरी)
लॉकडाऊन काळातही अशाच प्रकारच्या अफवेने पोल्ट्रीधारकांचे नुकसान झाले. आताही हे संकट पाहून आम्ही जगतो की मरतो, हेच समजत नाही. सरकारने आता बघ्याची भूमिका न घेता मदत केली पाहिजे.
- विनायक क्षीरसागर (पोल्ट्रीधारक, कोल्हापूर)
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय-
पोल्ट्रीधारक शेतकरी - ४२००
पक्ष्यांची संख्या - ६२ लाख
गुंतवणूक - ९९ कोटी २० लाख (शेडसह)
कर्जे - सुमारे १७० कोटी