कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, गव्याला हुसकावताना घडली दुर्घटना
By उद्धव गोडसे | Updated: March 26, 2023 17:10 IST2023-03-26T17:10:37+5:302023-03-26T17:10:51+5:30
गावाजवळ आलेल्या गव्याला हुसकावताना बिथरलेल्या गव्याने शेतात काम करणा-या शेतक-याला जोरदार धडक दिल्याने शेतकरी ठार झाला.

कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, गव्याला हुसकावताना घडली दुर्घटना
पोर्ले तर्फ ठाणे- गावाजवळ आलेल्या गव्याला हुसकावताना बिथरलेल्या गव्याने शेतात काम करणा-या शेतक-याला जोरदार धडक दिल्याने शेतकरी ठार झाला. ही घटना कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथे रविवारी (दि. २६) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. माणिक बळवंत पाटील (वय ४८, रा. कसबा ठाणे) असे मृत शेतक-याचे नाव आहे.
पन्हाळा तालुक्यातील माजगाव, कसबा ठाणे परिसरात रविवारी सकाळपासून एक गवा मानवी वस्तीत फिरत असल्याने त्याला पुन्हा जंगलात हुसकावून लावण्यासाठी तरुणांची टोळकी हुल्लडबाजी करीत आहेत. दुपारी गवा कसबा ठाणे गावाच्या हद्दीत शिरला. यावेळी १५ ते २० तरुण आरडाओरडा करीत गव्याला हुसकावत होते. त्याचवेळी गावापासून जवळच असलेल्या शेतात काम करीत असलेले शेतकरी माणिक पाटील यांच्यावर गव्याने चाल केली. अचानक गवा समोर आल्यामुळे पाटील यांना सुरक्षित ठिकाणी जाता आले नाही.
गव्याने समोरून जोरदार धडक दिल्याने पाटील यांच्या पोटात डाव्या बाजुला शिंग घुसले, तर छातीला गंभीर दुखापत झाली. या धडकेत पाटील सुमारे १० ते १२ फूट हवेत फेकले गेले. गवा काही अंतर दूर जाताच तरुणांनी जखमी पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे.घटनेची
गव्याने शेतक-यावर हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचा-यांनी कसबा ठाणे गावाकडे धाव घेतली. हुल्लडबाजी करणा-या तरुणांना शांत राहण्याचे आवाहन करीत, गव्याला जंगलाकडे हुसकावण्याचे काम सुरू केले. दरम्यान, गव्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतक-यांनी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर संताप व्यक्त केला.