मोबाईल ॲपवरून शेतीचे व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:49+5:302020-12-05T04:55:49+5:30
सेनापती कापशी : शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. या उद्देशाने हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील प्रगतिशील ...

मोबाईल ॲपवरून शेतीचे व्यवस्थापन
सेनापती कापशी : शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. या उद्देशाने हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील प्रगतिशील शेतकरी गिरीश कुलकर्णी यांनी गेली पाच वर्षे विविध प्रयोग राबवून "अंकुर फार्मसीस च्या नावाने मोबाईलवरून शेतीचे नेटके नियोजन करता येईल, असे ॲप तयार केले आहे. याचा सर्वप्रथम वापर त्यांनी स्वतः केला आहे. शनिवारी, दि. ५ रोजी या मोबाईल ॲपचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
बदलते हवामान, पिकावर होणारी कीड व रोगांचा प्रादुर्भाव, झपाट्याने बदलणारे शेतीचे स्वरूप अशा अनेक कारणांमुळे शेती व्यवसायात अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहेत.
या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी शेती हा एक व्यवसाय म्हणून स्वीकारला पाहिजे. हा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी व्यावसायिक शेतीची कास धरली पाहिजे. बाजारात ज्या पिकांची मागणी आहे अशीच पिके आपल्या शेतात घेतली पाहिजेत. हे सर्व करत असताना शेतकऱ्यांनी पिकावर व शेतावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रणदेखील ठेवणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांना दीपक पाटील, राम फडतरे व गौरी कंटक यांनी सहकार्य केले आहे. ॲप विकसित करण्यासाठी मोठा आर्थिक लोड आला असला तरी हे ॲप शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले.
शेती व्यवस्थापन ॲपमध्ये हवामान, माती परीक्षण, माझे प्लाॅट, माझे रोपण, माझा क्रियाकलाप, माझे कामगार, कर्मचारी उपस्थिती, कर्मचारी वेतनपट, माझा साठा, साठा वापर, माझे पीक, माझी पीक विक्री, माझे उत्पन्न, माझा खर्च, अहवाल, आदी मेनूच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने शेतीच्या सर्व नोंदी ठेवता येतात. शेतकऱ्यांना समजेल अशा भारतातील कोणत्याही भाषेत हे ॲप वापरता येते.
फोटो : १) गिरीश कुलकर्णी