मुलाणी कुटुंबाने केले हिंदू मुलीचे कन्यादान !

By Admin | Updated: June 14, 2016 00:18 IST2016-06-13T23:39:35+5:302016-06-14T00:18:46+5:30

विवाह सोहळा : भेडसगाव येथे हिंदू-मुस्लीम ऐक्याची प्रचिती

Family of the daughter of a married daughter | मुलाणी कुटुंबाने केले हिंदू मुलीचे कन्यादान !

मुलाणी कुटुंबाने केले हिंदू मुलीचे कन्यादान !

बाबासाहेब कदम --वारणा कापशी --सोशल मीडियाच्या माध्यमातून जात आणि धर्मांवर आधारित पोस्ट टाकण्यात आणि वाचण्यात काहींना आनंद मिळतो. परंतु भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील निवृत्त मुख्याध्यापक बाळ मुलाणी यांनी मात्र स्वत:च्या मुलीसारखे सांभाळलेल्या हिंदू मुलीचे कन्यादान करून आगळा आदर्श निर्माण केला आहे.सविस्तर वृत्त असे : हिंदू -मुस्लीम असा कोणताही भेदभाव न मानता सामाजिक उपक्रम जोपासणारे मुलाणी कुटुंब संपूर्ण गावाला परिचित. याच गावातील पाटबंधारे खात्यात नोकरी करणारे आकाराम शंकर पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांना दोन मुली असल्याने पालनपोषणाची जबाबदारी आई रेखा पाटील यांच्यावर होती. येईल त्या परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी रोजगार करत मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळली. काळाच्या ओघात मोठी मुलगी संजीवनीचे लग्न झाले. परंतु लहान मुलगी नकुशीच्या शिक्षणाचा प्रश्न आईसमोर आ-वासून उभा होता. नकुशीला मुलाणी कुटुंबाच्या घरी ठेवून आई रोजगाराला निघून जायची. मुलाणी कुटुंबीयांना या मुलीचा एवढा लळा लागला की त्यांनी आपल्या मुलीचा दर्जा देऊन सुजाता असे नामकरण देखील केले. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपत सुजाताच्या शिक्षणासह तिच्या लग्नाची जबाबदारी आपल्या कुटुंबावर घेतली. कापशी (ता. शाहूवाडी) येथील भीमराव मामलेकर यांचा मुलगा रमेश मामलेकर यांच्याशी विवाह ठरला. स्वत:च्या दारात विवाह मंडप उभारून हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्नदेखील लावून दिले. मुस्लीम कुटुंबाने ग्रामीण भागात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पत्नी हायातबी मुलाणी यांनी आईची तर सूरज मुलाणी याने भावाची भूमिका निभावत सुजाताचा लग्नसोहळा मोठ्या आनंदात पार पाडला. बिराज मुलाणी, जहॉँगीर मुलाणी यांच्यासह अनेक नातेवाईक उपस्थित होते.


भेडसगाव (ता. शाहूवाडी) हिंदू समाजातील मुलगी सुजाता हिच्या विवाह सोहळ्यात कन्यादान करताना मुस्लीम दाम्पत्य बाळ मुलाणी, हायातबी मुलाणी.

Web Title: Family of the daughter of a married daughter