‘घोसाळकर नानां’चे वैफल्यातून खोटे आरोप
By Admin | Updated: December 5, 2014 00:46 IST2014-12-05T00:28:45+5:302014-12-05T00:46:57+5:30
राजेश क्षीरसागर : बदनामीचा दावा ठोकणार

‘घोसाळकर नानां’चे वैफल्यातून खोटे आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने दिलेला पराभवाचा दणका नगरसेवक सत्यजित कदम यांच्या जिव्हारी लागला आहे. खिलाडूवृत्तीने पराभव पचविण्यापेक्षा कुरघोडीचे राजकारण करीत माझ्या बदनामीचा डाव कदम यांनी आखला आहे. वैफल्यातून हे ‘घोसाळकर नाना’ खोटे आरोप करीत आहेत.
त्यामुळे कदम यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज, गुरुवारी पत्रकाद्वारे दिला. पोलिसांकडून गुन्ह्यांबाबत मिळालेल्या लेखी माहितीच्या आधारेच निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्रात माहिती दिल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी या निवेदनात दिले.
आमदार क्षीरसागर यांनी आॅक्टोबर २०१४ मध्ये राज्य निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्हे व त्यांचा तपशील याची अपूर्ण माहिती दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यामध्ये तफावत आहे. क्षीरसागर यांनी १५ गुन्ह्यांची माहिती लपविल्याने त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कदम यांनी काल, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती.
याबाबत स्पष्टीकरण करताना क्षीरसागर यांनी पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची सही असलेल्या पत्राधारे मिळालेल्या माहितीद्वारेच निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगितले. पोलिसांच्या पत्राच्या आधारेच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याची माहिती न घेताच आरोप करणाऱ्या बालिश बुद्धीच्या कदम यांनी पोलिसांच्या पत्राची तरी नोंद घ्यावी, असा घणाघातही क्षीरसागर यांनी केला.
प्रतिष्ठेसाठी आमदार होऊ पाहणाऱ्या कदम यांनी निवडणुकीस उभारण्यापूर्वी चुकीच्या पद्धतीने व पैशाने मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्चूनही करवीरच्या स्वाभिमानी जनतेने मला २२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून दिले व मतदारांनी कदम यांना त्यांची जागा दाखविली. सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमी आंदोलकाची भूमिका घेतल्यानेच गेल्या पाच वर्षांत माझ्यावर ५५ गुन्हे नोंद झाले आहेत. हे सर्व गुन्हे कॉँग्रेस व राष्ट्रवादीने लादले आहेत. माझ्यावरील गुन्ह्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व करवीरच्या जनतेला अभिमान आहे, याची कदम यांनी नोंद घ्यावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला.
निवडणूक प्रचारादरम्यान प्रॉपर्टी, मठ-तालीम, आदी बिनबुडाचे आरोप बगलबच्च्यांमार्फ त करून सत्यजित कदम यांनी माझी नाहक बदनामी केली. विनाकारण बदनामी करणाऱ्या या ‘घोसाळकर नाना’ व त्यांच्या बगलबच्च्यांवर लवकरच पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
- राजेश क्षीरसागर, आमदार