‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर हल्ला
By Admin | Updated: April 7, 2015 01:19 IST2015-04-06T23:36:50+5:302015-04-07T01:19:41+5:30
तरुणीचे चित्रीकरण : शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून फलकाचे दहन

‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर हल्ला
कोल्हापूर : चेंजिंग रूममध्ये तरुणींचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या ताराबाई पार्कातील ‘फॅब इंडिया’च्या शोरूमवर शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी हल्ला करून तोडफोड केली. यावेळी दुकानाच्या फलकाचे दहन करून निषेध करण्यात आला. काही दिवसांपूर्वी ‘फॅब इंडिया’ या शोरूममधील एका कर्मचाऱ्याने मोबाईलवरून चेंजिंग रूममध्ये गेलेल्या तरुणीचे चित्रीकरण केले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तरुणास अटक केली होती. या घटनेपाठोपाठ गोवा येथील ‘फॅब इंडिया’च्या शोरूममध्येही असाच प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे कार्यकर्ते शोरूमवर चाल करून गेले. शोरूम गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शोरूमच्या दरवाजावर दगड घालून तोडफोड केली, तसेच दुकानाच्या नावाच्या फलकाचे दहन करण्यात आले. या हल्ल्याची माहिती समजताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. यावेळी या घटनेचा निषेध करत येथील व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.