Kolhapur: अवांतर खासगी परीक्षांची संस्थांनाच ‘गोडी’; ज्ञानदानापेक्षा ‘अर्थ’कारणच मोठे

By पोपट केशव पवार | Published: February 23, 2024 11:49 AM2024-02-23T11:49:43+5:302024-02-23T11:50:07+5:30

पोपट पवार कोल्हापूर : मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या नावाखाली राज्यातील अनेक प्रकाशन संस्था, खासगी शैक्षणिक अकॅडमींनी अवांतर खासगी परीक्षेच्या ...

Extortion of parents through extra private exams by private educational academies | Kolhapur: अवांतर खासगी परीक्षांची संस्थांनाच ‘गोडी’; ज्ञानदानापेक्षा ‘अर्थ’कारणच मोठे

Kolhapur: अवांतर खासगी परीक्षांची संस्थांनाच ‘गोडी’; ज्ञानदानापेक्षा ‘अर्थ’कारणच मोठे

पोपट पवार

कोल्हापूर : मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या नावाखाली राज्यातील अनेक प्रकाशन संस्था, खासगी शैक्षणिक अकॅडमींनी अवांतर खासगी परीक्षेच्या माध्यमातून पालकांची लूट चालविली आहे. या परीक्षा घेण्यामागील या संस्थांचा ‘लाख’मोलाचा ‘अर्थ’ आता उलगडू लागला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यात पुण्या-मुंबईतील अशा अनेक संस्था चांगल्याच फोफावल्या असून, या परीक्षांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानी बनवण्यापेक्षा त्यातून बक्कळ कमाई मिळवण्याकडेच यांचा कल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा परीक्षांना आता आवरा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

आपली मुले लहान वयातच ज्ञानी बनली पाहिजेत, ही पालकांची अवास्तव अपेक्षा काही संस्थांच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे समृद्धी टॅलेंट, जीटीएस, गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षा, प्रज्ञा शोध, अशा चौदा ते पंधरा परीक्षा पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. पुण्यासह, मुंबईतील काही प्रकाशन संस्था, खासगी अकॅडमी या परीक्षांच्या जाहिराती करतात.

प्रत्येक विद्यार्थ्याकडून दोनशे ते ५०० रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारले जाते. तालुका, जिल्हा व विभागस्तरावर बक्षिसांची रक्कम ठरवली जाते. विशेष म्हणजे, एका-एका तालुक्यात दहा-दहा हजार विद्यार्थी अशा परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांच्या शुल्कामधूनच संबंधित संस्था ‘मालामाल’ होत असल्याने या परीक्षांची विद्यार्थ्यांपेक्षाही या संस्थांनाच अधिक ‘गोडी’ लागली आहे.

परीक्षा शुल्क नको, पुस्तके घ्या

काही प्रकाशन संस्था अशा परीक्षांचे आयोजन करताना परीक्षा मोफत घेण्याची जाहिरात करतात. मात्र, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आमच्याच प्रकाशन संस्थेची पुस्तके घेण्याची अट ठेवतात. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थ्याला २५० ते ३०० रुपयांचे एक पुस्तक दिले जाते. अशा माध्यमातूनही अनेकांनी पैसे कमवण्याची नवी शक्कल लढविली आहे.

अशा परीक्षा हव्यातच कशाला?

मुळात विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बुद्धिमापन, सामान्य ज्ञान याचे धडे दिले जातात. बहुतांश सर्वच शाळांमध्ये अशा परीक्षांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे खासगी संस्थांच्या परीक्षांचे भूत या विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर का बसवता? असा सवाल शिक्षणतज्ज्ञांमधून उपस्थित केला जात आहे.

भुदरगड, करवीरमध्ये विनाशुल्क परीक्षा

जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी पुढाकार घेत भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये बीटीएस, करवीर तालुक्यात केटीएस परीक्षा विनाशुल्क सुरू केली आहे. कोल्हापूर महापालिकेमध्येही केटीएस परीक्षा घेतली जाते.


टॅलेंट सर्च परीक्षा व्हाव्यात, अशी पालकांची मागणी आहे. भुदरगड, करवीर, पन्हाळा, कोल्हापूर महापालिका येथे विनाशुल्क अशा परीक्षा आम्ही आयोजित करतो. मात्र, अजूनही असंख्य विद्यार्थी यापासून वंचित राहत आहेत. याचाच फायदा खासगी संस्था घेतात. -विश्वास सुतार, शिक्षणविस्तार अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Extortion of parents through extra private exams by private educational academies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.