मानव विकास निर्देशांकात वाढ अपेक्षित
By Admin | Updated: January 16, 2015 00:16 IST2015-01-15T23:44:35+5:302015-01-16T00:16:55+5:30
राजाराम माने : जिल्हा नियोजन समिती लहान गटांची बैठक

मानव विकास निर्देशांकात वाढ अपेक्षित
कोल्हापूर : जिल्हा सर्वसाधारण योजनांच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांकात वाढ करून तळागाळांतील लोकांचे उत्पन्न व रोजगारात वाढ होईल, यादृष्टीने विभागप्रमुखांनी शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी येथे केले.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे सन २०१५-१६ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखड्याअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची योजनांनिहाय छाननी करण्यासाठी आयोजित केलेल्या लहान गटांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, सदस्य परशराम तावरे, जयवंतराव लायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत सर्व यंत्रणांकडील योजनेअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या सन २०१५-१६ मध्ये अपूर्ण राहणाऱ्या व नवीन कामांच्या यादींसह निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी माने म्हणाले, सर्व विभागांनी प्रस्ताव सादर करताना मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने योजनांची शिफारस करावी. साधनसंपत्ती व जनतेचा विकास यादृष्टीने शासनाचे उत्पन्न वापरात यावे, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. योजना प्रस्तावित करताना खातेप्रमुखांनी त्याचा अभ्यास करावा.
आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, जिल्हा सर्वसाधारण योजनांच्या माध्यमातून प्रभावी काम करावे. त्याचा जनता आणि संबंधित विभागाला लाभ व्हावा, यादृष्टीने प्रस्तावांची सूक्ष्म पद्धतीने छाननी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वंकष विकास व पर्यायाने
जनतेचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक आहे.
सन २०१५-१६ च्या जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी १६३ जिल्हास्तरीय योजना निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनांना जवळपास ३२ कोटी निधी देणे आवश्यक आहे.
यावेळी कृषि, शिक्षण, महिला व बालविकास, समाजकल्याण सहकार, ग्रामविकास, पशुसंवर्धन, जलसंधारण, मत्स्य व्यवसाय, वनविभाग, ग्रामीण रोजगार, एकात्मिक ग्रामीण विकास, पाटबंधारे, पूरनियंत्रण, जिल्हा उद्योग केंद्र, तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, आरोग्य, पाणीपुरवठा, नगरविकास, ग्रंथालय, यासह विशेष घटक योजनांच्या जिल्हा सर्वसाधारण योजनेतील प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)