चित्रकलेची विस्तारली क्षितिज
By Admin | Updated: August 19, 2014 00:39 IST2014-08-18T23:59:24+5:302014-08-19T00:39:27+5:30
करियरच्या वाटाही निर्माण : इन्ंिटरियर, कॉर्पोरेट जगतालाही भुरळे

चित्रकलेची विस्तारली क्षितिज
इंदुमती गणेश - कोल्हापूर --कलानगरी कोल्हापूरला लाभलेल्या चित्र परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या पंखांनी नवी क्षितिजे निर्माण केली आहेत. चित्रांच्या आॅनलाईन प्रदर्शनातून जगभरात पोहोचतानाच गृहसजावट, कार्यालये, हॉटेल्स या स्थळांची शोभा वाढविताना ग्राफिक्स, इंटेरियर डिझायनिंग, अॅनिमेशन या करिअरच्या वाटा चित्रांच्या माध्यमातून निर्माण झाल्या आहेत.
कोल्हापूरच्या मातीला कलेचा गंध आहे. कॅनव्हॉसवर अवतरलेली चित्रे आणि विविध सामाजिक, कलात्मक, चळवळींची साथ देणारी शिल्पे हे या शहराचे वैभव. जलरंगातील प्रवाही चित्रकृती ही कोल्हापूरची खासियत. आता मात्र मॉडर्न आर्ट, ग्रीटिंग, मायक्रो लॅन्डस्केप अशा नव्या कलाकृतींची निर्मिती होत आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत झालेल्या माध्यमक्रांतीने कलाक्षेत्राचे जगच धुंडाळून काढले. आयटी, इंजिनिअरिंग, कलादिग्दर्शन, ग्राफिक्स, डिझायनिंग, डिजिटलायझेशन, इन्टिरिअर आणि अॅनिमेशन या करिअरच्या नव्या वाटांनी चित्रकलेला सर्वाधिक महत्त्व आले आहे. पूर्वी ‘कलेसाठी कला’ असे चित्रांचे स्वरूप होते. मार्केटिंग असा भागच नव्हता. त्यामुळे ही चित्रे कलाकारांच्या घरांच्या चौकटी बाहेर पडली नाहीत. पुढे भटकंती करून चित्रनिर्मिती व विक्री केली जात असे. त्यांनतर प्रदर्शनांद्वारे चित्रकलेनी व कलाकारांनी रसिक मनाला साद घातली. चित्र-शिल्प किंवा कोणतीही कला म्हणजे प्रदर्शने एवढेच समीकरण झाले होते. आता मात्र सोशल मीडियाने केलेल्या क्रांतीने या कलेच्या विस्तारात आडकाठी ठरलेल्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
भारतीय संस्कृतीचे आकर्षण कायम..
भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब सांगणाऱ्या चित्रांना आजही रसिकांमधून प्रचंड मागणी आहे. राजस्थानी जीवनशैली, कोकण किनारपट्टी, धनगर, जेजुरी, मराठमोळी संस्कृती अशा चित्रांचे आकर्षण कायम आहे; मात्र मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अमूर्तवाद (अॅबस्ट्रॅक) शैलीतील चित्रांना मागणी आहे. या शैलीतील चित्रे समजण्यास तशी अवघड असतात.
कार्यालये, हॉटेल्स, गृहसजावट
घरांच्या इन्टिरिअरसाठी चित्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उपलब्ध जागा, घराची रंगसंगती, चित्रांच्या माध्यमातून निर्माण होणारे अपेक्षित वातावरण आणि व्यक्तींची आवड या गोष्टी विचारांत घेऊन बिल्डर किंवा इंटेरिअर व्यावसायिक कलाकारांकडे चित्र-शिल्पांची मागणी करतात. याशिवााय कॉर्पोरेट कार्यालये, हॉटेल्स्मध्ये लावण्यात आलेली चित्रे आलेल्या व्यक्तींचे मन आकर्षून घेत आहेत.
-पूर्वी चित्र-शिल्प विक्रीचे एकमेव माध्यम म्हणजे प्रदर्शने होती. आता मात्र इंटरनेटवर चित्रांचा फोटो अपलोड केल्यानंतर त्याला पसंती मिळाली की, लगेचच चित्रांची खरेदी-विक्री होत असल्याने परदेशातील बाजारपेठ कलाकारांसाठी खुली झाली आहे.
-या कलाकृतींच्या प्रमोशनसाठी देश-परदेशातील प्रदर्शनांसोबतच इंटरनेट, आर्ट लायब्ररी, आर्ट मेळा, यु ट्यूबवरून मार्गदर्शन याद्वारे चित्र-शिल्प कलेचे क्षेत्र विस्तारले आहे. यामुळेच कोल्हापुरातील नव्या पिढीच्या चित्र-शिल्पकारांनी स्वत:च्या वेबसाईटस् तयार केल्या आहेत. याशिवाय कॅनव्हॉस मंत्रा, कोल्हापूर आर्ट फौंडेशन असा संस्थांच्या आॅनलाईन सेवेला मिळणाऱ्या लाईक्स्ची संख्या २ ते ३ लाखांच्या पटीत आहे.