कुरुंदवाडची राजकीय परंपरा संपुष्टात
By Admin | Updated: December 5, 2014 00:22 IST2014-12-04T23:52:26+5:302014-12-05T00:22:28+5:30
विधानसभा निवडणूक : कॉँग्रेस नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ, पालिका निवडणुकीवर बदलत्या राजकीय समीकरणाचा परिणाम

कुरुंदवाडची राजकीय परंपरा संपुष्टात
गणपती कोळी - कुरूंदवाड -येथील शहरावर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारांचाच पगडा आहे. त्यामुळे पालिका स्थापनेपासून आजतागायत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला एकतर्फी मताधिक्य मिळाले आहे. या विधानसभा निवडणुकीत हा विचार इतिहासजमा झाला असून, प्रथमच शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे शहराच्या कॉँग्रेस नेतृत्वावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून, नव्या राजकीय समीकरणाचा परिणाम नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी एकवेळा विधानसभा व दोनवेळा लोकसभा निवडणूक लढविली. ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विश्वासू नेतृत्व करत तिन्ही वेळा ‘व्होट’ आणि ‘नोट’चा नारा देत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. अशा परिस्थितीतही पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम, आमदार डॉ. सा. रे. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे या कॉँग्रेसच्या, तर राष्ट्रवादीच्या माजी खा. निवेदिता माने यांच्या पाठीशीच शहरातील मतदार राहिले. त्यामुळे कॉँग्रेसी विचारांचा पगडा या शहरावर कायम राहिला आहे. शहरातील कॉँग्रेसचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सा. रे. पाटील यांच्या पाठीशीच राहून शहरातील मतदार कॉँग्रेसी विचारांची परंपरा चालवतील, अशी आशा होती. मात्र, तालुक्यातील बदलते राजकीय समीकरण, कॉँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच स्वाभिमानीत पडलेली फूट व तालुक्यातील राजकारणात प्रस्थापितांकडून मराठा नेतृत्वावर होत असलेला अन्याय यातून शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी उदयास आली.
तालुक्यात मराठा समाजाचे मतदार प्रथम क्रमांकावर असतानाही कॉँग्रेस, राष्ट्रवादी या समाजाच्या उमेदवाराला डावलले. खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीमध्ये उल्हास पाटील चळवळीतील खंदा कार्यकर्ता व बहुजनांचा आरसा असतानाही खा. शेट्टींनी त्यांची उमेदवारी डावलल्याने पाटील शिवसेनेच्या आश्रयाला गेले, अन् बहुजन समाजाच्या उमेदवाराला संधी मिळाल्याने त्यातच चळवळीचा संयमी नेतृत्व अशी पाटील यांची ओळख असल्याने प्रत्येक गावांतून त्यांनी मताधिक्य घेतले. परिणामी नेहमी कॉँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी असणारे शहरात प्रथमच पाटील यांच्या रूपाने शिवसेनेच्या पाठीशी जाऊन कॉँग्रेसी विचाराची परंपरा मोडीत काढली.
येथील राजकीय नेत्यांनी सोयीचे राजकारण केले असले, तरी बदलत्या राजकीय समीकरणातून भाविष्यातील राजकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीतून कॉँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
गावात सुमारे चौदा हजार मतदार
शिरोळ विधानसभा मतदारसंघात जयसिंगपूरनंतर कुरूंदवाड शहराचीच मतदारसंख्यानुसार वर्णी लागते. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सुमारे चौदा हजार मतदार आहेत. मराठा, मुस्लीम, लिंगायत, जैन यांच्यासह बाराबलुतेदार समाज आहे. नगरपालिकेची स्थानिक निवडणूक वगळता येथील मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेहमी कॉँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशीच राहिले आहेत.