विजय कदम : गोकुळ शिरगाव : रविवार तसा प्रत्येकाच्याच आवडीचा... या दिवशी काय करायचे याचे प्लॅनिंग अनेकांचे आधीच ठरलेले... मात्र, गोकुळ-शिरगावकरांनी हा दिवस एका विधायक कार्यासाठी सत्कारणी लावला आहे. येथील बहुतांश कुटुंबांतील एक तरी सदस्य हातात झाडू घेऊनच रविवारच्या सकाळची सुरुवात करतो. स्वच्छतेचे महत्त्व पटलेल्या गोकुळ-शिरगावकरांनी प्रत्येक रविवारी लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेचा जागर सुरू केल्याने ‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण या गावाने आपल्या कार्यातून प्रत्यक्षात खरी करून दाखविली आहे. गोकुळ-शिरगावमध्ये आठवड्यातील दर रविवारी ग्रामस्थांच्या सहभागातून गावाची स्वच्छता केली जाते. यामध्ये शेकडो हात राबत असतात. विशेष म्हणजे यासाठी युवकांचा पुढाकार लक्षणीय आहे. गोकुळ-शिरगाव गाव पूर्वेस व पश्चिमेस तेवढ्याच लोकसंख्येने वसले आहे. गावची लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. यामध्ये गाव वेगवेगळ्या उपनगरांत विभागलेले आहे. त्यामुळे पूर्ण गावची स्वच्छता करणे ग्रामपंचायतीसाठी मोठे आव्हान होते. म्हणून सरपंच महादेव पाटील यांनी लोकसहभागातून स्वच्छता करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. युवकांनीही यात सहभाग घेत ही चळवळ आता गतिमान केली आहे. गावात दर रविवारी स्वच्छता केली जात असल्याने गावातील अनेक चौक, रस्ते चकाचक झाले आहेत.
कोट : गोकुळ शिरगावमध्ये वाढत्या उपनगर वस्तीमुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता करणे जिकिरीचे होते. त्यामुळे लोकसहभागातून स्वच्छता करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. यात युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. यामुळे गाव कायम स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.
- महादेव पाटील,
लोकनियुक्त सरपंच, गोकुळ शिरगाव
फोटो २२ गोकुळ-शिरगाव स्वच्छता मोहीम
गोकुळ शिरगाव येथे आठवड्यातील दर रविवारी ग्रामस्थांच्या सहभागातून गावात स्वच्छता मोहीम राबविली जाते.