सबकुछ प्रॅक्टिस !

By Admin | Updated: November 29, 2014 00:27 IST2014-11-29T00:26:34+5:302014-11-29T00:27:56+5:30

केएसए लीग फुटबॉल : शिवनेरी, पीटीएम ‘ब’वर मात

Everything Practice! | सबकुछ प्रॅक्टिस !

सबकुछ प्रॅक्टिस !

कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, शुक्रवारी प्रॅक्टिस क्लबच्या ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन्ही संघांनी विजय मिळवित दिवस गाजवला. प्रॅक्टिसच्या ‘अ’ संघाने शिवनेरी स्पोर्टस्वर २-१ अशी मात केली, तर दुसऱ्या सामन्यात ‘ब’ संघाने पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघावर निसटता विजय मिळविला.
छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर दुपारच्या सत्रात पहिला सामना प्रॅक्टिस क्लब ‘अ’ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून शिवनेरीच्या युवराज पाटोळे, सूरज जाधव, अर्जुन साळोखे, दीपराज राऊत यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रॅक्टिस क्लबवर दबाव निर्माण केला. २६व्या मिनिटास शिवनेरीकडून प्रेम कोरवी याने गोल नोंदवीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिस ‘अ’कडून हृषीकेश जठार, ओंकार पाटील, सुमित घाटगे, अजिंक्य मस्कर यांनी बरोबरी साधण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र, त्यांना यश आले नाही.
उत्तरार्धात प्रॅक्टिस ‘अ’कडून ५६ व्या मिनिटास अभिनव साळोखेने मैदानी गोलची नोंद करीत १-१ अशी बरोबरी साधली. सामना बरोबरीत आल्याने शिवनेरीच्या आघाडीच्या खेळाडूंनी पुन्हा प्रॅक्टिस ‘अ’च्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. मात्र, प्रॅक्टिसचा गोलरक्षक करण शिंदे याने उत्कृष्ट गोलरक्षण करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. ७४ व्या मिनिटास प्रॅक्टिसकडून पुन्हा जोरदार चढाई करण्यात आली. यात राहुल पाटीलने गोल नोंदवीत आपल्या संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत राहिल्याने सामना प्रॅक्टिस ‘अ’ ने २-१ अशा गोलफरकाने जिंकला.
दुसरा सामना प्रॅक्टिस क्लब ‘ब’ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ यांच्यात झाला. प्रॅक्टिस‘ब’ संघाचे सामन्यावर प्रारंभापासून वर्चस्व होते, तरीही मध्यंतराला सामना गोलशून्य बरोबरीत होता. उतरार्धातही गोलफलक बराच वेळ कोरा होता. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना पाटाकडीलच्या पेनल्टी क्षेत्रात मिळालेल्या संधीवर प्रॅक्टिस ‘ब’च्या सौरभ हारूगलेने उत्कृष्ट गोल करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाटाकडील ‘ब’च्या खेळाडूंनी बरोबरी करण्यासाठी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, त्यांना यश आले नाही. सामना प्रॅक्टिस ‘ब’ ने १-० असा निसटता जिंकला.

‘केएसए’ला बालगोपाल देणार पोस्टर रूपातून शुभेच्छा
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या जुन्या फुटबॉलची परंपरा आताच्या पिढीला छायाचित्राच्या रूपाने व्हावी, याकरिता बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी एक मोठे पोस्टर मिरजकर तिकटी येथे लावण्यात येणार आहे. याचे उद्घाटन रविवारी (दि. ३०) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
७५ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल करणाऱ्या ‘केएसए’ला शुभेच्छा देण्यासाठी तत्कालीन छत्रपती फुटबॉल क्लब, शिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस क्लब, बाराईमाम फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचे गु्रप फोटो या पोस्टरवर असणार आहेत.


मैदानात रुग्णवाहिकेची गरज
दोन दिवसांपूर्वी आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युज याचा चेंडू लागून मृत्यू झाला. यापासून केएसएने बोध घ्यावा. फुटबॉलसारख्या रांगड्या खेळातही अनेकदा एकमेकांना धक्का लागून जखमी होण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी मैदानावर डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची नितांत गरज असल्याचे मत अनेक फुटबॉलशौकिनांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Everything Practice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.