‘एव्हरेस्ट’वर चढाईसाठी वर्षभरात मोहीम काढणार
By Admin | Updated: July 7, 2016 00:39 IST2016-07-07T00:26:38+5:302016-07-07T00:39:49+5:30
प्रमोद पाटील : ‘आर्टिफिशियल वॉल’ तयार करणार

‘एव्हरेस्ट’वर चढाईसाठी वर्षभरात मोहीम काढणार
जगातील प्रत्येक गिर्यारोहकाला आयुष्यात एकदा तरी ‘माउंट एव्हरेस्ट’ सर करण्याची इच्छा असते. त्याप्रमाणे अनेक गिर्यारोहक प्रयत्नही करतात. त्यातील काहीजणांना त्यात यशही येते. मात्र, काहींना येत नाही; पण अपयश येऊनही न खचून जाता अखंडपणे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ गिर्यारोहक तयार करून त्यांच्या रूपाने हे शिखर पार करण्याचे स्वप्न पाहणारे व हिलरायडर्स गु्रपचे सर्वेसर्वा व राज्य शासनाच्या गड संवर्धन समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला थेट संवाद.
प्रश्न : ‘गिर्यारोहण’ या साहसी खेळाकडे आपण कसे आकर्षित झाला ?
उत्तर : मला सायकलवरून लांब लांब जाण्याची हौस होती. त्यात मी पन्हाळा, जोतिबा, अजिंठा, वेरूळ, कोकण, आदी ठिकाणी सायकलवरून गेलो. ही बाब त्यावेळी कोल्हापुरातील अनेकांना माहीत होती. याचदरम्यान कोल्हापूरला क्रीडा संकुल व्हावे, म्हणून एक आंदोलन सुरू होते. यात एक लाख स्वाक्षऱ्या घेऊन पंतप्रधानांना निवेदन द्यायचे, असे येथील लोकांना वाटले. सर्व निवेदन तयार झाले. मग द्यायचे कसे तेही अनोख्या पद्धतीने व्हावे म्हणून मला कोल्हापूर ते दिल्लीपर्यंत सायकलवरून जाण्याचे अनेकांनी सुचविले. मग मी अशा मोहिमा करायला सदैव तयार होतो. तब्बल ३६ दिवस सायकल चालवून दिल्लीत पोहोचलो. तेथे पंतप्रधान काय भेटले नाहीत. मग तत्कालीन राज्यपाल वसंतदादा पाटील हे त्यावेळी उपस्थित होते. त्यांना निवेदन दिले. पुढे काही दिवसांनी पुन्हा कोल्हापुरात आल्यावर माझा ‘गोकुळ’चे तत्कालीन अध्यक्ष अरुण नरके यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला. माझी उमेद पाहून मला नरकेसाहेबांनी यूथ हॉस्टेलचे सदस्य म्हणून घेतले. त्यावेळी
एक किंवा दोन दिवसांच्या पदभ्रमंतीच्या मोहिमात मी सहभागी होऊ लागलो. त्याच दरम्यान मला विनोद कांबोज भेटले. त्यातून मग संजय कुरणे, मृदुला बोकील, वैशाली बागलकोटे, बंधू संजय पाटील यांच्या मदतीने हिल रायडर्सची स्थापना केली. १९८५ साली प्रथम पन्हाळा-पावनखिंड ही पहिली पदभ्रमंतीची मोहीम काढली. यावेळी मला गुरुवर्य इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी मार्गदर्शन केले. ही मोहीम तीन दिवस चालली. पुढे या इवल्याशा रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले. मग काय हिमालयातील अनेक शिखरे, देशातील
२०० हून दुर्ग, सुळके सर केले.
प्रश्न : पहिल्या मोहिमेत किती लोक सहभागी झाले ?
उत्तर : इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांच्या सूचनेनुसार आम्ही हिल रायडर्सच्या माध्यमातून छत्रपती शिवराय ज्या वाटेवरून गेले आणि जी भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली, त्याच मार्गावरून आपणही सांघिकरीत्या जायचे ठरविले. बघता बघता शंभरावर लोक जमले आणि ही मोहीम आम्ही पूर्ण केली. याच मोहिमेत आम्ही त्यावेळी ‘साहस हा पाया आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन’ हे ध्येय निश्चित केले.
प्रश्न : आपण किती मोहिमांमध्ये सहभाग घेतला?
उत्तर : मला इतिहासाची महती इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी, निनाद बेडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी मंत्री साबीर शेख यांच्यामुळे होत गेली आणि गड-किल्ले यांच्याबद्दल आकर्षण आणि गोडी वाढू लागली. यातून माऊंटेनिअरिंग अर्थात गिर्यारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. मी विनोद कांबोज यांच्या समवेत महाराष्ट्रातील अवघड सुळके सर केले. त्यामध्ये विशाळगडावरील वरात अर्थात कुवरखंबा, तैलबैला, ढाकबैरी, कळकरायत, नानाचा अंगठा, वानरलिंगी, हडबीची शेंडी, अशा लहान मोठ्या सुळक्यांचा समावेश होता. गिर्यारोहणातील गुरू हिरा पंडित यांची ओळख झाली. त्यात माझी ईर्षा व जिद्द पाहून हिमालयातील गडवाल येथील २० हजार फुटांवरील ‘थैलू’ हे हिमशिखर सर केले. त्यात मला बर्फावर चालण्याचा सराव नव्हता. तो सरावही पंडित यांनी करून घेतला. त्यात मी ही मोहीम अवघड असल्याने माघारी फिरायचे असे ठरविले होते. मात्र, पंडित यांनी अरे शाहूरायांच्या भूमीतला तू गडी, माघारी फिरायचं नाही, असे समजावले. पहाटे तीन वाजता हे शिखर चढण्यास सुरुवात केली. बघता बघता हे शिखर सरही केला. त्यानंतर रुद्रगेरा, कोटेश्वर, अन्नपूर्णा, नंदनवन, तपोवन, धोतीताल, पिंडारीग्लेसियर ही अती उंचावरील शिखरे सर केली. यातील अन्नपूर्णा हा १६ हजार फुटांवरील बेस कॅम्प सलग १६ वर्षे पूर्ण केला.
प्रश्न : कच्छ वाळवंटातील धांगतारा बेट व फ्लेमिंगो सिटी कशी पाहायला मिळाली ?
उत्तर : सीमा सुरक्षा दलाने भारतातील गिर्यारोहकांना कच्छ येथील ४३० किलोमीटरच्या वाळवंटातील पदभ्रमंतीसाठी माझ्यासह दहाजणांची निवड केली होती. ३६ दिवस ही मोहीम भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सुरू होती. यात मला वाळवंटातील धांगतारा बेट व फ्लेमिंगो पक्षांचे थवे असणारे स्थान अर्थात सिटी बघायला मिळाली. हा भाग सातत्याने युद्धजन्य परिस्थितीचा असल्याने सामान्यांना या ठिकाणी जाता येत नाही. मात्र, आम्हाला या निवडीमुळे ही संधी प्राप्त झाली. यात लष्कर कोणत्या पद्धतीत सीमेवर देशाचे संरक्षण करते, याची कल्पना आली.
प्रश्न : हिमालयातील एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्पचा अनुभव कसा होता ?
उत्तर : प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न म्हणजे एव्हरेस्ट आयुष्यात कधी ना कधी तरी सर करायचाच असे असते. मलाही ती संधी मिळाली. यात मला हिरा पंडित सरांनी मदत केली. मला केवळ एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंतच जाता आले. कारण मला बर्फावरील सराव नव्हता. त्यात तांत्रिक व हवामान बिघाडाच्या आणि ‘माऊंटेन सिकनेस’चा त्रास झाला. त्यामुळे एव्हरेस्ट सर करण्याचा माझा प्रयत्न फोल ठरला. मात्र, मी या प्रयत्नात मला शरीराने साथ दिली नाही; पण मी हरलो नाही. गेली ३0 वर्षे माझ्या रूपाने का नसेना दुसऱ्या मुला-मुलींना यासाठी तयार करीत आहे. यंदा तर आमच्या संस्थेकडे प्रत्येकी दहा मुले, मुली या मोहिमेला जाण्यासाठी तयार आहेत. याकरिता आम्ही कोल्हापूरकर एव्हरेस्ट शिखर मोहीम येत्या वर्षात काढणार आहोत. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
प्रश्न : गिर्यारोहण वाढीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत ?
उत्तर : गेली ३0 वर्षे हजारो युवक -युवतींनी पन्हाळा-पावनखिंड या मोहिमेसह अनेक मोहिमा आयोजित केल्या आहेत. त्यात पुणे, मुंबईतील तज्ज्ञ गिर्यारोहकांना पाचारण केले आहे. याशिवाय यंदा तर आम्ही एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी मोहीम आखण्याच्या तयारीत आहे. याकरिता मुंबई, पुणे प्रमाणेच कोल्हापुरातही ‘आर्टीफिशियल वॉल’ तयार करण्याचा मानस आहे. याकरिता महापालिकेने बंद पडलेल्या शाळा, मैदान मिळाल्यास त्यादृष्टीने कोल्हापुरातूनही गिर्यारोहक तयार होतील. यासह माऊंटेनिअरिंगमधील उच्च संस्था असणाऱ्या नेहरू माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंगमधील हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, मनाली येथील अटलबिहारी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये येथील मुलांच्या प्रवेशासाठी नोंदणीही केली आहे. मात्र, प्रतीक्षा यादी असल्याने येत्या वर्षात प्रवेश मिळेल.
प्रश्न : साहसी खेळाचा युवकांना काय उपयोग आहे ?
उत्तर : सध्याची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे चालली आहे. व्यसन करण्यात युवकांना धन्यता वाटते. विशेष म्हणजे गाड्या भरधाव वेगाने चालविणे, सेल्फी काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता कुठेही चढणे. हे काही साहस नव्हे. कारण अत्यंत खडतर शिखरे चढताना शारीरिक तंदुरुस्ती, मनाची एकाग्रता, निर्णयक्षमता यांचा कस या खेळात लागतो. हे साहस केवळ छंद म्हणून नाही तर करिअर म्हणूनही अनेकांनी जोपासले आहे. यातील अनेक गिर्यारोहक आयएएस, आयपीएस, पोलिस निरीक्षक, सरकारी अधिकारी, परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत.
- सचिन भोसले