MPSC Exam Postponed : कोल्हापुरातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संताप, सायबर चौकात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:34 IST2021-03-11T18:27:19+5:302021-03-11T18:34:00+5:30
Mpsc Exam Kolhapur-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा ऐन परीक्षेच्या तोंडावर अवघ्या ३ दिवस आधी पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे परीक्षार्थी उमेदवार संतप्त झाले असून विद्यार्थ्यांनी येथील सायबर चौकात रास्तारोको केला तर ऐतिहासिक बिंदू चौकात काही विध्यार्थी संघटनानी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या संतापाला वाट दिली. दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे.

MPSC Exam Postponed : कोल्हापुरातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संताप, सायबर चौकात रास्तारोको
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा ऐन परीक्षेच्या तोंडावर अवघ्या ३ दिवस आधी पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे परीक्षार्थी उमेदवार संतप्त झाले असून विद्यार्थ्यांनी येथील सायबर चौकात रास्तारोको केला तर ऐतिहासिक बिंदू चौकात काही विध्यार्थी संघटनानी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या संतापाला वाट दिली. दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे.
एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील विद्यार्थी आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शिवाजी विद्यापीठ तसेच सायबर कॉलेज चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली, मात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने जमा होऊ लागल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात ऐतिहासिक बिंदू चौकात काही विध्यार्थी संघटनानी जोरदार घोषणाबाजी केली.
गुरुवारी सकाळी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरुन याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. शिवाजी विद्यापीठ, सायबर कॉलेज चौक, शिवाजी पेठ येथील अभ्यासिकेतील परीक्षार्थी नाराजी झाले. गेली दीड वर्षे अभ्यास करुन पुस्तकांसाठी इतका खर्च करुनही परीक्षा पुढे गेल्याने ते संतप्त झाले, त्यातच पुण्यात परीक्षार्थी रस्त्यावर उतरल्याने कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटले.
चार दिवसांपूर्वी हॉल तिकिट संकलीत करण्याची सूचना दिली होती आणि आता परीक्षा पुढे ढकलल्याने त्यांना धक्का बसला. कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये अनेक निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचे या परिपत्रकात आयोगाने म्हटले आहे.
इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीतह्व, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी विध्यार्थी अक्षय अनिल काजवे यांनी दिली आहे.
या परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत. नव्या तारखा यथावकाश जाहीर केल्या जातील, असं म्हटल्यामुळे नेमक्या परीक्षा पुन्हा कधी होणार? याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.
कोविड व्यवस्थापन आणि लॉकडाऊन या गोष्टींच्या खेळखंडोबात विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोघडीला लागत आहे, याचा कधी तरी विचार करा. निवडणुका रॅली, सभा, मोर्चे यावेळी निघणारे मार्ग प्रशासनात काम करणातऱ्या एमपीएससी परीक्षेवेळी निघतच नाहीत का ? कोविडची काळजी घेण्याची अक्कल किमान भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे असेल एवढा तरी विश्वास ठेवायला हवा होता. हेच विद्यार्थी उद्या महाराष्ट्र प्रशासनात काम करणारे आहेत याचे किमान भान ठेवुन निर्णय घ्यायला हवा होता ? प्रचंड अभ्यास करून परीक्षाच रद्द केल्यावर चीड, राग येणं स्वाभाविक आहे पण हीच आपली टेस्टिंग आहे. काहीही झालं तरी अभ्यास जसा सुरू आहे, तसाच सुरू ठेवूया.
-अक्षय अनिल काजवे,
परीक्षार्थी, कोल्हापूर.