कोरोना काळातही कडू कारल्याने आर्थिक गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:13+5:302021-07-19T04:16:13+5:30
कोपार्डे : कोरोनाकाळात शेतीमालालाही दर मिळत नाही असे चित्र असताना बाजारपेठेचा अंदाज घेत वाकरे (ता. करवीर) येथील कृष्णात ...

कोरोना काळातही कडू कारल्याने आर्थिक गोडवा
कोपार्डे : कोरोनाकाळात शेतीमालालाही दर मिळत नाही असे चित्र असताना बाजारपेठेचा अंदाज घेत वाकरे (ता. करवीर) येथील कृष्णात पाटील या शेतकऱ्याने कारली फळभाजीची लागवड केली. अवघ्या तीन महिन्यांत १७ टन कारली उत्पादन व पाच लाख रुपये उत्पन्न कारली फळभाजीतून मिळवून शेतकऱ्यांसमोर त्यांनी आदर्श शेतीचे उदाहरण ठेवले आहे.
कृष्णात पाटील यांची स्वतःची पानस्थळ १० एकर जमीन आहे. पारंपरिक ऊसशेती करण्यावर पाटील यांचा भर असायचा; पण गेल्या तीन वर्षांपासून याला फाटा देत पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत घरगुती भाजीसाठी लागणारी कारली फळभाज्या लागवडीचा निर्णय घेतला.
या वर्षी ७ एप्रिलला व्हीएनआर या जातीच्या कारली बियाण्यांची लागवड केली. ४५ गुंठे क्षेत्रात साडेचार फूट सरी सोडून बेडवर ठिबक व पॉलिथिन पेपर टाकून लागवड करण्यात आली होती. ठिबक पद्धतीचा वापर करून पाणी, खते देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उच्चांकी कारली उत्पादन घेण्यास मदत झाली. अवघ्या तीन महिन्यांत १७ टन कारली उत्पादन मिळाले आहे. दरही ३० ते ३५ रुपये मिळाला आहे. यातून खर्च वजा जाता किमान पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोनाकाळातही चांगला उठाव
कोरोनाकाळात लॉकडाऊन असतानाही घरगुती भाजीसाठी कारल्यांना मोठी मागणी आहे. त्यातच कारल्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने इतर फळभाज्यांच्या तुलनेत मोठी मागणी आहे.
दर दोन दिवसाआड ७०० ते ८०० किलो कारले उत्पादन मिळत असल्याने त्याचा तोडा व बाजार समितीत व्यापाऱ्यांना विक्री करण्याचे नियोजन करावे लागत होते; पण कुटुंबातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडल्याने कारली उत्पादनातून चांंगले उत्पन्न मिळाल्याचे पाटील सांगतात.
प्रतिक्रिया
उसाच्या शेतीत किमान दीड वर्ष जमिनीचे क्षेत्र गुंतून राहते. ऊस तुटल्यानंतरही कारखान्याकडून वेळेत ऊस बिल मिळत नाही. यामुळे कमी कालावधीत व रोख पैसे देणाऱ्या कारले उत्पादनासाठी गेली तीन वर्षे लागवड करीत आहे.
कृष्णात पाटील, शेतकरी
फोटो
वाकरे (ता. करवीर) येथील प्रगतशील शेतकरी कृष्णात पाटील यांची कारल्याची शेती. कारली तोडा झाल्यानंतर त्यांचे पॅकिंग करताना.