सात दशकानंतरही पुन्हा एकदा खाशाबाना पद्म पुरस्काराची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:36+5:302021-02-05T07:13:36+5:30
कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांनी देदीप्यमान कामगिरी करून सात दशके उलटली आहेत. ...

सात दशकानंतरही पुन्हा एकदा खाशाबाना पद्म पुरस्काराची हुलकावणी
कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांनी देदीप्यमान कामगिरी करून सात दशके उलटली आहेत. मात्र, त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरविणे उचित होते. मात्र, यंदाही प्रस्ताव परिपूर्ण असूनही त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. त्यांच्यासह कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे, सांगलीची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधने यांचेही प्रस्ताव पद्म पुरस्कारासाठी होते. मात्र, त्यांच्याही नावाचा विचार या पुरस्कारासाठी झाला नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देशाला पहिले पदक मिळवून दिले. या कामगिरीनंतर १९९४ साली टेनिसपटू लिएंडर पेस याने देशाला ऑलिम्पिकमधील कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर त्याला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन गौरविले. मात्र, पाच दशकांपूर्वी पदक मिळवून देणारे खाशाबा यांच्या कामगिरीची दखल केंद्राने घेतली नाही. त्यांच्या हयातीत त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. यंदा मात्र, राज्याच्या पद्म पुरस्कार समितीने शिफारस करूनही केंद्र सरकारने त्यांच्या नावाचा विचार पद्म पुरस्कारासाठी केला नाही. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातून मरणोत्तर पद्म पुरस्काराची अपेक्षा असताना घोर निराशा झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
खाशाबांसह यंदा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे यानेही आपल्या कामगिरीची दखल घेत आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता प्रस्ताव दाखल केला होता. त्याच्याही प्रस्तावाचा विचार केंद्राने केला नाही. त्याच्यासोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची आधारस्तंभ असलेली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधने हिनेही प्रस्ताव दाखल केला होता. तिच्याही प्रस्तावाचा विचार केंद्राच्या पद्म पुरस्कार समितीने विचार केला नाही. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोट
सात दशकांनंतर तरी केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार समितीने मरणोत्तर पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते.
-रणजित जाधव, खाशाबांचे सुपुत्र
प्रतिक्रीया
कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने वीरधवलला पद्म पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते.
- विक्रम खाडे, वीरधवलचे वडील
प्रतिक्रीया
बीसीसीआयकडून शिफारस जाणे गरजेचे होते. तरीसुद्धा यंदा नाही तर पुढील वर्षी तिला पद्म पुरस्कार प्राप्त होईल.
- श्रीनिवास मानधने, स्मृतीचे वडील