‘ईएसआयसी’ची ओपीडी लवकरच : श्रावणी अकोळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:19 IST2018-08-31T01:18:37+5:302018-08-31T01:19:22+5:30

कोल्हापुरात बुधवारी चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी ईएसआयसी रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन ‘ईएसआयसी’चे श्रावणी अकोळकर यांना दिले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, आनंद माने, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
कोल्हापूर : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी) रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) लवकरच सुरू होणार आहे. त्या ठिकाणी इतर सेवा-सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, अशी माहिती ‘ईएसआयसी’च्या शाखाधिकारी श्रावणी अकोळकर आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुष्यंत खेडीकर यांनी बुधवारी येथे दिली.
‘लोकमत’ने दि. २४ आॅगस्टचा अंकात ‘औषधांअभावी सुरू होईना ‘ईएसआय’ रुग्णालय’ हे वृत्त दिले होते. त्यानंतर कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने ‘ईएसआयसी’च्या शाखाधिकारी अकोळकर आणि वैद्यकीय अधीक्षक खेडीकर यांची भेट घेतली. त्यामध्ये ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, सचिव एस. ए. औंधकर, आदींचा समावेश होता.
यावेळी अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे ८० हजार कामगारांची ‘ईएसआयसी’अंतर्गत नोंदणी आहे. त्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुरी आहे. त्यामुळे सर्व सुविधांसह रुग्णालय लवकर सुरू करावे. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी ईएसआयसी रुग्णालयाअभावी उद्भवलेल्या अडचणी सांगितल्या. त्यावर शाखाधिकारी अकोळकर आणि वैद्यकीय अधीक्षक खेडीकर यांनी लवकरात लवकर ईएसआयसीची ओपीडी सुरू केली जाईल, असे सांगितले.
बैठक घ्या
या ईएसआयसी रुग्णालयाबाबतच्या विविध अडचणींचे निराकारण होण्यासाठी विभागीय संचालक संजय सिन्हा आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली. याबाबतचे पत्रदेखील त्यांनी दिले आहे.