छोट्या युद्धांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By Admin | Updated: November 20, 2014 00:03 IST2014-11-19T23:52:12+5:302014-11-20T00:03:34+5:30

स्टुअर्ट गॉर्डन : शिवाजी विद्यापीठ इतिहास अधिविभागाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

Environmental degradation due to small wars | छोट्या युद्धांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

छोट्या युद्धांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

कोल्हापूर : राजपुतान्यातील छोट्या-छोट्या राजघराण्यांत परस्परांमध्ये सातत्याने युद्धे होत होती. मोठमोठ्या फौजा आक्रमणासाठी जेव्हा दूरच्या पल्ल्याचा प्रवास करीत, तेव्हा त्यांच्यासोबत घोडदळ आणि हत्तीदळाचा समावेश असे; यामुळे वाटेत येणाऱ्या संपूर्ण परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे. याचा पर्यावरणावर दूरगामी परिणाम झाला, असे प्रतिपादन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे वरिष्ठ संशोधक प्रा. स्टुअर्ट गॉर्डन यांनी आज, बुधवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज ‘मराठा कालखंडातील युद्धांचे पर्यावरणीय परिणाम’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे होते.
गॉर्डन म्हणाले, या युद्धांचा परिणाम दूरगामी राहिला. हिरवळीचे प्रदेश संपुष्टात येत. त्यातून तृणभक्षी जनावरांचे अस्तित्व धोक्यात आले आणि एकूणच पर्यावरणाची साखळी धोक्यात आली. शिकारीच्या खेळांचाही या पर्यावरणावर मोठा परिणाम होत असे. या लढायांची व्याप्ती राजपुतान्यापासून मावळ प्रांतापर्यंत होती. त्यामुळे त्यांचे परिणाम सुपीक मावळ परिसरालाही भोगावे लागले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. भोईटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रजाहितदक्ष राजांनी आपल्या जनतेला वनसंपत्तीच्या संवर्धनाची वेळोवेळी लेखी आदेशांद्वारे जाणीव करून दिलीच. शिवाय, फौजा कोठेही जात असल्या तरी, पिकांची काडीही मोडता कामा नये, याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे मराठा कालखंडात किंवा त्यापूर्वी जितके पर्यावरणाचे नुकसान झाले, त्यापेक्षा अधिक नागरीकरण ब्रिटिश राजवटीत आणि औद्योगिकीकरणामुळे झाले. ब्रिटिशांनी इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा स्थानिकांच्या विकासासाठी आणि स्वत:च्या लाभासाठी पुरेपूर वापर करून घेतला. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले. याप्रसंगी इतिहास अधिविभाग प्रमुख प्रा. माधव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. कविता गगराणी यांनी सूत्रसंचालन केले. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्र्राचे समन्वयक प्रा. एम. ए. लोहार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. अशोक चौसाळकर, प्रा. य. ना. कदम, प्रा. अरुण भोसले, प्रा. पी. डी. राऊत यांच्यासह शिक्षक, विद्यार्र्थी व इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Environmental degradation due to small wars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.