उद्योजकांचे दीपस्तंभ...
By Admin | Updated: October 17, 2014 23:35 IST2014-10-17T23:34:52+5:302014-10-17T23:35:37+5:30
स्वकर्तृत्वाचा मानदंड

उद्योजकांचे दीपस्तंभ...
संतोष मिठारी - कोल्हापूर -फारसे शिक्षण झाले नसतानाही अनुभवाच्या जोरावर आणि जिद्दीला कष्टाची जोड देत सामान्य कुटुंबातून आलेल्या चंद्रकांत परुळेकर, दिवंगत माधवराव करजगार आणि गौसलाजम शेख या उद्योजकांनी कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात आपले नाव कोरले. शिवाय येथील औद्योगिक विकासाला हातभार लावण्यासह नवोदित उद्योजकांसाठी दीपस्तंभ ठरलेल्या या उद्योजकांना ‘केईए उद्योगश्री २०१४’ पुरस्काराने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन (केईए) सन्मानित करणार आहे. त्यानिमित्त या उद्योजकांच्या कारकिर्दीवर ‘लोकमत’ने टाकलेला प्रकाश...
स्वकर्तृत्वाचा मानदंड
यंत्रविशारद दिवंगत माधवराव करजगार यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा मानंदड निर्माण केला. मूळचे मिरज येथील करजगार यांची घरची परिस्थिती बेताची होती. बालपणातच त्यांनी किर्लोस्करवाडीत औद्योगिक कारागिरीचे धडे घेतले. त्यानंतर सातारा, मुंबईत काम केल्यानंतर १९४५ मध्ये त्यांनी कोल्हापुरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्याकडे अवघे १९ रुपयांचे भांडवल होते. त्याच्या जोरावर उद्योजक सीताराम करजगार, चरणे व आरवाडे यांच्या साथीने भागीदारीमध्ये वर्कशॉप सुरू केले. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी शिवाजी उद्यमनगरातून कूपर इंजिनच्या सुट्या भागांचे उत्पादन सुरू केले. ‘एम. के. मोनोग्रॉम’ या आॅईल इंजिनची त्यांनी १९५८ मध्ये निर्मिती केली आणि ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले. गूळ उत्पादनासाठी त्यांनी उसाचे चरके (घाणा) तयार केला. बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांनी उद्योगाचे ‘आॅटोमेशन’ केले. क्रँकमधील तज्ज्ञ करजगार यांनी टप्प्याटप्प्याने फौंड्री, क्रशर विभाग विकसित केला. त्याचबरोबर त्यांनी नवोदित लघुउद्योजकांनाही उभे केले. त्यांना पत्नी मालतीबाई, मुले विजय, धनंजय, संजय यांनी साथ दिली.
- कल्पक ‘शेखचाचा’
मेहनती वृत्तीच्या दिवंगत गौसलाजम ईलाई शेख (शेखचाचा) यांचा जन्म कोल्हापुरात झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी शुगर मिलमध्ये कामाला सुरुवात केली; पण स्वयंउद्योगाचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिवाजी उद्यमनगरमधील कारखान्यांमध्ये तांत्रिक ज्ञानाची कमाई करीत त्यांनी १९५६ मध्ये उद्यम इंजिनिअरिंग वर्क्स हे छोटे वर्कशॉप, गनमेटलची मूसभट्टी सुरू केली. जिद्दीला कष्टाची जोड देत त्यांनी उद्योग वाढविला. वाय. पी. पोवार यांच्या मदतीतून त्यांनी कास्ट आयर्नची फौंड्री सुरू केली आणि त्यांची कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतीत नवी ओळख निर्माण झाली. गनमेटल बुशिंग, बेअरिंगपासूनची त्यांची सुरुवात आॅईल इंजिनला लागणाऱ्या बिडाचे कास्टिंग, गव्हर्नर वेट, लायनर पिस्टनपर्यंत पोहोचली. १९८२ नंतरच्या औद्योगिक मंदीनंतर ते टिल्टिंग आॅईल फायर फर्नेसकडे वळाले. देशासह ब्राझील, नैरोबी, केनिया आणि दक्षिण आफ्रिकेतील साखर कारखान्यांना उत्पादने पाठविली. कुशिरे या खेड्यात त्यांनी २००६ मध्ये ‘मेल्टिंग पॉर्इंट’द्वारे आॅटोमोबाईल कास्टिंग उत्पादन केले. उद्योजक असूनही त्यांनी आयुष्यभर सायकलचाच वापर केला. कामगार, कुटुंब आणि समाजबांधवांसाठी त्यांनी जवाहरनगरात नमाज पठणासाठी मशीद उभारली. त्यांच्या उद्योजकीय प्रवासात पत्नी शहानूरबी यांनी धडाडीने साथ दिली. आयुष्यातील चढ-उतारांना धैर्याने तोंड देत साकारलेला उद्योग मुले मुबारक आणि दिलावर यशस्वीपणे पुढे नेत आहेत.
ल्ल संशोधक वृत्तीचे उद्योजक उपजत अभियांत्रिकी ज्ञानाच्या बळाला संशोधक वृत्तीची जोड देत चंद्रकांत मुरलीधर परुळेकर यांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे. मूळचे मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील असलेले परुळेकर कुटुंबीय १९२३ मध्ये कोल्हापुरात आले. गंगावेशमध्ये वर्कशॉप सुरू करून तिथे चंद्रकांत यांचे वडील उसाचे घाणे, मशीन्स, पंप्सची दुरुस्ती करायचे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चंद्रकांत यांनी वडिलांच्या हाताखाली तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली. सुट्या भागांची निर्मिती आणि दुरुस्तीचे काम करताना वेगळे काहीतरी करण्याची धडपड सुरू होती. त्यातून कोल्हापुरातील उमा चित्रमंदिराचा वर आणि बाजूला जाणारा पडदा बनविण्यात त्यांना वडिलांच्या माध्यमातून यश आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असे पडदे तयार केले. चंद्रकांत यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रेक्षागृहातील जगातील पहिला सेमी सर्कल पद्धतीचा पडदा तयार केला. उद्योगात कार्यरत असतानाही त्यांनी संशोधन सुरूच ठेवले. झिरो शॅडो, अंबाबाईचा किरणोत्सव, विजयदुर्गच्या रामेश्वर मंदिरातील किरणोत्सवातील बारकावे शोधून त्यांनी त्यातील अडथळे दूर केले. काचेच्या लहान तोंडाच्या बाटलीत खुर्ची, कॉट, पुतळा, शिडी साकारण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांच्या संशोधन व तांत्रिक कामासाठी मुलगा पवन आणि मुलगी शुभांगी यांची महत्त्वपूर्ण मदत होते. चंद्रकांत यांना विविध वस्तू जमविण्याचा छंद आहे. त्यातून त्यांनी जगातील विविध राष्ट्रांची सहा हजार नाणी, लाकडी खेळणी, आदींचा संग्रह केला आहे.
दीपक गद्रे यांच्या उपस्थितीत आज सन्मान
शिवाजी उद्यमनगरातील शेठ रामभाई सामाणी हॉलमध्ये उद्या, शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘केईए उद्योगश्री’ पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीतील गद्रे मरिन एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे दीपक गद्रे उपस्थित असतील. ते ‘आमचे उद्योग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शांतीलाल ओसवाल, मनोहर चव्हाण-बंदरे, जयंत तेंडुलकर, धोंडिराम गवळी, प्रभाकर घाटगे या ज्येष्ठ उद्योजकांसह उद्योजक सरोज आयर्न इंडस्ट्रीजचे बापूसाहेब जाधव, डी. एन. विंड सिस्टीम्स इंडियाचे नितीन वाडीकर व धनंजय बुधले, मेटाफोर सिंथेसिसच्या नलिनी नेने, एस. जी. फायटो फार्मा, एस. एस. मिरजे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी दुपारी साडेचार वाजता ‘केईए’ची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.