‘कर्नाटक’वर उद्योजक ठामच

By Admin | Updated: July 12, 2014 00:42 IST2014-07-12T00:36:00+5:302014-07-12T00:42:13+5:30

हालचाली वाढल्या : १४५० जणांनी केली १४०० एकर जागेची मागणी

Entrepreneur talk on 'Karnataka' | ‘कर्नाटक’वर उद्योजक ठामच

‘कर्नाटक’वर उद्योजक ठामच

कोल्हापूर : उद्योगवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून जाहीर होऊनदेखील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक वीज दरवाढीच्या मुद्द्यावर कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयावर ठामच आहेत. आज, शुक्रवारी अखेर गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनकडे (गोशिमा) १ हजार ४५० उद्योजकांनी जागेसाठी अर्ज केला असून, त्यांनी एकत्रितपणे १४०० एकर जागेची मागणी केली आहे.
पायाभूत सुविधांची कमतरता, वाढलेले वीजदर, पाणी बिलातील वाढ, आदींमुळे वैतागलेल्या उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यात कोल्हापूरच्या उद्योजकांनी पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यांपासून कार्यवाही सुरू केली. उद्योगांना भेडसविणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी निवेदन देऊन, प्रत्यक्षात चर्चा करून, आंदोलन करूनदेखील उद्योजकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यानंतर ‘गोशिमा’ने ज्या उद्योजकांना कर्नाटकात जमीन हवी आहे, त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले.
त्यानुसार आजअखेर १ हजार ५१० अर्जांची विक्री झाली असून, त्यापैकी १ हजार ४५० उद्योजक कर्नाटकमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. त्यांनी एकत्रितपणे सुमारे १ हजार ४०० एकर जागेची मागणी केली आहे. केंद्रात बहुमत असलेले सरकार आणि या सरकारकडून उद्योगवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प जाहीर झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील हे उद्योजक कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतली, अशी अपेक्षा होती.
मात्र, अर्थसंकल्प जरी, उद्योगवाढीला पोषक असला, तरी वीज दरवाढ कमी करण्याबाबत राज्य सरकारकडून काहीच हालचाली नसल्याने कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा पक्का निर्णय संबंधित उद्योजकांनी घेतला आहे. कोगनोळी, आडी, मगलेट्टी, इंचनाळ, कसनाळ, कारदगा, चिंचगणी, जैनापूर, गळदगा येथील भूसंपादनाचा सर्व्हे करून त्याबाबतचा अहवाल कर्नाटकच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. अपेक्षित आणि आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाकडून हालचाली वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Entrepreneur talk on 'Karnataka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.