पालिकेच्या प्रवेशद्वारात चुली पेटविल्या
By Admin | Updated: July 3, 2014 00:53 IST2014-07-03T00:51:32+5:302014-07-03T00:53:57+5:30
नेहरूनगर झोपडपट्टीवासीयांचे आंदोलन : बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याची मागणी

पालिकेच्या प्रवेशद्वारात चुली पेटविल्या
इचलकरंजी : झोपडपट्टी पुनर्वसनाचे अर्धवट बांधकाम त्वरित पूर्ण करून लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा द्यावा, या मागणीसाठी नेहरूनगर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांनी आज, बुधवारी पालिकेच्या प्रवेशद्वारातच चुली पेटवून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला. सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत येथील नेहरूनगर झोपडपट्टीत ६३६ घरकुले बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ महिन्यांत घरकुले बांधून त्याचा ताबा देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. एकूण घरकुलांपैकी अवघ्या ४८ घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हे काम गत तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. परिणामी लाभार्थ्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे. प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सत्तारूढ कॉँग्रेसचे नगरसेवक अब्राहम आवळे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण पोवार, बहुजन विकास संघाचे अध्यक्ष समीर जमादार यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी पालिकेवर मोर्चा
काढला.
या लाभार्थ्यांनी सुरुवातीला पालिकेच्या प्रवेशद्वारात येताच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले, नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, आदी प्रवेशद्वारात येताच आंदोलनकर्त्यांनी त्यांना अडवून कोंडण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस आंदोलनस्थळी आले. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांत शाब्दिक चकमक उडाली.
लाभार्थी महिलांनी पालिकेच्या आवारात दोन चुली मांडून त्यावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली, तर काही लाभार्थ्यांनी चक्क चटई अंथरूण तेथेच विश्रांती घेतली. जोपर्यंत मुख्याधिकारी सुनील पवार आंदोलनस्थळी येऊन चर्चा करणार नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने गोंधळात आणखी भरच पडली.
सुमारे दोन तासांनंतर अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, पोलीस अधिकारी, नगरसेवक विठ्ठल चोपडे, आदींनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांना घरकुलांचे बांधकाम दोन दिवसांत सुरू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलक शांत झाले. आंदोलनात सुमारे शंभरावर लाभार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)