पंचगंगा नदीतील अतिक्रमणे हटवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:00+5:302021-08-15T04:26:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रूकडी माणगाव : रुई बंधाऱ्यासह पूरपरिस्थितीच्या उपाययोजनांसाठी 'ॲक्शन प्लॅन' तयार करून भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, ...

पंचगंगा नदीतील अतिक्रमणे हटवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
रूकडी माणगाव
: रुई बंधाऱ्यासह पूरपरिस्थितीच्या उपाययोजनांसाठी 'ॲक्शन प्लॅन' तयार करून भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार केला जाईल. तसेच नदीतील अतिक्रमण हटविण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. रूई बंधाऱ्यामुळे बाधित होत असलेली शेतजमीन व रूई गावात येत असलेल्या पूर परिस्थितीची पाहणी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी केली.
रूई येथील मोठया पुलामुळे जवळपास पाच हजार हेक्टर ऊसशेती पुराने बाधित झाली आहे. सततच्या पुरामुळे येथील शेती खराब व नुकसानीची होत आहे. यास रूई येथील पूलच कारणीभूत असल्याने माजी उपसभापती अरुण मगदूम व झाकीर भालदार यांनी आमदार राजू आवळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. पुलास मोठ्या कमानी बंधाव्यात अन्यथा शेतकरी जलसमाधी करतील, असा इशाराही दिला होता. याबाबत आमदार राजू आवळे यांनी पाहणी करून पालकमंत्र्यांना नुकसानीची माहिती दिली होती. तसेच पुलास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याची विनंती केली होती. शनिवारी आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांनी रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली. येथे सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक झाकीरहुसेन भालदार व अरुण मगदूम यांनी पुलास मोठ्या कमानी बांधाव्यात, याबाबत निवेदन दिले. यावेळी माणगाव, रुई, प. कोडोली, इंगळी, रुकडी, चंदूर आदी गावांतील लोकप्रतिनिधी, शेतकरी, पूरबाधित मोठ्या संख्येने उपस्थित होते.