सत्तेसाठी मंत्रिपदाचे गाजर
By Admin | Updated: March 21, 2017 00:54 IST2017-03-21T00:54:03+5:302017-03-21T00:54:03+5:30
जिल्हा परिषद : लोकसभा-विधानसभेचे गणित; भाजपकडून सर्व पातळ्यांवर फिल्डिंग

सत्तेसाठी मंत्रिपदाचे गाजर
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठा पणाला लावल्याने एकेका मतासाठी पैशापासून पदापर्यंत वाट्टेल ते देण्याची तयारी दोन्ही पक्षांकडून दाखविली गेली. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच घुसळून निघाले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पायाभरणीच या घडामोडीतून होत आहे.
महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजपला पक्ष म्हणून एकेक जिल्हा परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. नगरपालिका, महापालिका व त्यापाठोपाठ पंचायत समित्यांमध्येही हा पक्ष एक नंबरवर राहिला आहे. तोच धडाका जिल्हा परिषदेतही सुरू राहावा यासाठी भाजपकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सरकारमधील विविध सत्तास्थानांचे आश्वासन दिले जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत निकालानंतर लगेच भाजपने अध्यक्षपदासाठी अरुण इंगवले यांचे नाव चर्चेत आणले होते. त्यामागे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याच घरात सर्व पदे नकोत, शिवाय भाजपची ही संस्कृतीही नाही असा विचार होता. त्यामुळे कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून इंगवले यांचे नाव चर्चेत आणले गेले. त्या नावास कुणाचा विरोध होणार नाही असाही होरा होता.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचे आणि महाडिक यांचे राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे महाडिक यांची सून शौैमिका महाडिक या जर भाजपच्या उमेदवार असतील तर कोरे ते मान्य करणार नाहीत अशी शक्यता व्यक्त होत होती, परंतु इंगवले यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावताना मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच महाडिक यांना फोन करून तुम्ही सूत्रे घ्या आणि भाजपचा अध्यक्ष करा, असे सांगितल्याचे समजते. तुमची सून अध्यक्ष झाली तरी भाजपची हरकत नाही असे स्पष्ट केल्यावर मग महाडिक यांनी आपले पत्ते खोलले. तुम्ही भाजपचा अध्यक्ष करून दाखवा, तुमच्या मुलग्यालाही पक्ष मंत्रिमंडळात संधी देईल, असेही आश्वासन दिले गेले आहे, अशीही चर्चा सोमवारी दिवसभर कोल्हापुरात होती.
मंत्रिपदाचे आमिष तेवढ्यावर थांबलेले नाही. शौमिका महाडिक यांना कोरे यांनी विरोध करू नये म्हणून त्यांना २०१८ मध्ये रिक्त होणाऱ्या जागेवर विधान परिषदेत संधी देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचेही सांगण्यात येत होते. त्यात कितपत तथ्य आहे हा भाग असला तरी अशा घडामोडी होणारच नाहीत असेही नाही. कोरे यांना भाजप हेतूपुरस्सर बळ देत आहे. कदाचित हातकणंगले मतदारसंघातून त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्याची रणनीती त्यामागे असू शकते. शेट्टी व भाजप यांच्यातील दरी पाहता असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदार नरके ‘भाजप’जवळ
काँग्रेसकडून राहुल पाटील यांचे नाव पुढे आल्याने शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके अस्वस्थ होते. पक्षाची भूमिका काँग्रेसला मदत करा अशीच असणार हे त्यांना माहीत होते, परंतु त्यांना करवीर मतदारसंघात पी. एन. यांच्या विरोधात आगामी विधानसभेला लढायचे आहे. राहुल पाटील हे अध्यक्ष झाले तर तेच कदाचित नरके यांच्या विरोधात रिंगणात असतील. त्यामुळे नरके यांची निर्णय घेताना चांगलीच कोंडी झाली. पक्षाचा काही निर्णय झाला तरी ते भाजपसोबतच राहतील हे स्पष्टच आहे. भले पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरी आगामी विधानसभेसाठी ते भाजपचे उमेदवार असू शकतात. कारण करवीर मतदारसंघात त्या पक्षाकडेही सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे त्याचा विचार करूनच नरके यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेत राहून धड सत्तेची संधी नाही, निधीही मिळताना अडचण आणि भवितव्य काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
खासदार महाडिक यांचा फोन..
जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यावर काँग्रेसची सत्ता व त्यातही राहुल पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे म्हटल्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी स्वत:हून पी. एन. पाटील यांना फोन करून माझी माणसे तुमच्यासोबत राहतील असे आश्वासन दिले, परंतु पुढे शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आल्यावर ते पी. एन. यांचा फोन घ्यायचेच बंद झाल्याची चर्चा श्रीपतराव दादा बँकेत जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत सोमवारी सुरू होती. लोकसभेच्या निवडणुकीत पी. एन. यांनी मदत केल्याने महाडिक यांना करवीर मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. पुढच्या निवडणुकीत पी. एन. यांना अंगावर घ्यायला नको असा धोरणीपणा महाडिक यांच्या फोनमागे होता.