शशिकपूरचा कोल्हापूरशी भावनिक स्नेहबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:10 PM2017-12-04T22:10:22+5:302017-12-05T00:16:04+5:30

An emotional affair with Shashikpur Kolhapur | शशिकपूरचा कोल्हापूरशी भावनिक स्नेहबंध

शशिकपूरचा कोल्हापूरशी भावनिक स्नेहबंध

Next
ठळक मुद्देजुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांची अनेक नाटके, चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात झाले. गर्दी ओसरल्यावर बूट सापडले पण तोपर्यंत शशिकपूर यांनी वाईचा रस्ता धरला होता.

भारत चव्हाण

कोल्हापुर: हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक नामांकित घराणे म्हणून नावलौकीक प्राप्त झालेल्या कपूर घराण्यातील पृथ्वीराज कपूर आणि त्यांचे पुत्र अभिनेते राजकपूर व शशिकपूर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक स्नेहबंध होता. त्याचे कारण म्हणजे पृथ्वीराज कपूर यांची अनेक नाटके कोल्हापुरात झाली तर राजकपूर यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द कोल्हापूरच्या मातीतून झाली; तर शशिकपूर हे लहानपणापासून पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर कोल्हापुरात येत राहिले. याच कोल्हापुरात राजकपूर भक्त कै. संभाजी पाटील यांच्या पुढाकाराने उभारलेल्या राजकपूर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभास उपस्थित राहिलेल्या शशिकपूर यांनी कोल्हापूरविषयीचे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जीवनाच्या अंतापर्यंत आपला या शहराशी स्नेहबंध राहील, असे सांगून उपस्थितांची मने जिंकली होती.

जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांची अनेक नाटके, चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात झाले. त्यावेळी वयाने लहान असलेले शशिकपूर वारंवार कोल्हापुरात येऊन गेले होते. त्याची आठवण स्वत: शशिकपूर यांनी करून दिली होती. कोल्हापूर महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले कै. संभाजी पाटील हे राजकपूर यांचे चाहते होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट पहिल्या दिवशी पहिला खेळ पाहायचे. राजकपूर यांचे निधन झाल्यावर व्याकुळ झालेले संभाजी पाटील यांनी हातउसने पैसे घेऊन मुंबई गाठली होती. राजकपूर यांचा पुतळा आपल्या कोल्हापुरात उभा करायचा, असा निर्धार त्यांनी अंत्ययात्रेवेळीच केला. संभाजी पाटील यांच्या पुढाकारातून माजी महापौर आर. के. पोवार, भिकशेठ पाटील,ज्येष्ठ दिग्दर्शक वाय. जी. भोसले, लालासाहेब गायकवाड, पत्रकार भारत चव्हाण अशा मोजक्या मंडळींनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करून राजकपूर यांचा पुतळा उभारला.

पुतळ्याचे अनावरण करायचे तर कपूर घराण्यातीलच कोणाच्या तरी हस्ते करायचे हा संभाजी पाटील यांचा अट्टाहास होता. कृष्णा कपूर यांना आमंत्रण देण्यात आले, परंतु वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शशिकपूर यांच्याशी बोलणं झालं. एका चाहत्याने एखाद्या अभिनेत्याचा अर्धपुतळा उभा करावा याचे शशिकपूरना खूप आश्चर्य वाटले. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी येण्याचे मान्य केले; पण तारीख ठरण्यास एक-दोन महिने गेले.

एके दिवशी तारीख निश्चित झाली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने दि. ३ जानेवारी १९९५ रोजी ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार आयोजित केला. त्याच्या दुसºया दिवशी म्हणजे दि. ४ जानेवारीला राजकपूर यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. पुतळा पाहून शशिकपूर खूप भारावून गेले. त्यांनी पाटील यांच्या कुटुंबीयांशी छोटेखानी घरात जाऊन संवाद साधत त्यांचे कौतुक केले.
या समारंभास तोबा गर्दी उसळलेली होती. शशिकपूर यांना तांबट कमानीपासून जुन्या वाशीनाक्यापर्यंत उघड्या जीपमधून मिरवणुकीने आणण्यात आले. यावेळी भाषण करताना कोल्हापूरविषयी त्यांनी भरभरून कौतुक केले. कपूर घराण्याचा नावलौकीक वाढविण्यात कोल्हापूरचा मोठा वाटा असल्याचे अगदी कृतज्ञतापूर्वक त्यांनी सांगितले. जीवनाच्या अंतापर्यंत आपला कोल्हापूरशी स्नेहबंध असेल, असेही त्यांनी सांगितले.

अशा घडल्या गंमती
शशिकपूर यांना आणण्यासाठी संयोजक दोन अलिशान गाड्या घेऊन गेले होते. हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांना या गाडीत बसण्याची विनंती केली. त्यांनी एका गाडीत बसण्याचा प्रयत्न केला; परंतु अंगाने जाड असलेल्या शशिकपूर यांना गाडीत बसता आले नाही. शेवटी त्यांनी आणलेल्या अ‍ॅम्बॅसिडर गाडीत बसणेच पसंत केले. दुसरी गम्मत अशी झाली, समारंभ संपल्यानंतर व्यासपीठाभोवती प्रचंड गर्दी झाल्यावर त्यांचे बूट सापडले नाहीत शेवटी ते अनवाणी तेथून गेले. गर्दी ओसरल्यावर बूट सापडले पण तोपर्यंत शशिकपूर यांनी वाईचा रस्ता धरला होता.

 हिंदी चित्रपट सृष्टीतील अजरामर व्यक्तीमत्व अभिनेते कै. राजकपूर यांच्या कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे उभारण्यात आलेल्या अर्धपुतळ्याच्या अनावरण समारंभास ज्येष्ठ अभिनेते शशीक पूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभात कोल्हापूरच्या पहिल्या महापौर जयश्री जाधव यांच्या हस्ते शशिकपूर यांचा सत्कार करण्यात आला.


जयप्रभा स्टुडिओला भेट...
पृथ्वीराज कपूर यांनी भालजींच्या चित्रपटात काम केले होते. राज कपूर यांच्या चेहºयाला पहिल्यांदा रंग लागला तो भालजींच्याच चित्रपटात. त्यावेळी त्यांना भालजींनी ५ हजार रुपये मानधन म्हणून दिले होते. जीवापाड प्रेम करणारी कोल्हापूरची माणसं माझ्या वडील आणि भावाने अनुभवली. या आठवणी जेव्हा मी त्यांच्याकडून ऐकल्या तेव्हापासून कोल्हापूर हे माझ्यासाठी वंदनीय स्थान झाले, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी लहानपणी भावंडांसोबततीन चाकी सायकलवरून फिरत असलेल्या जयप्रभा स्टुडिओलाही भेट दिली होती. १९७२ च्या दरम्यान आलेल्या चोर मचाये शोर या चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी पन्हाळ््यावर केले होते. त्यावेळी त्यांचा वाढदिवस तेथील हॉटेल रसनामध्ये साजरा करण्यात आला होता.
कोल्हापूरचे मा. विनायक यांच्या कन्या म्हणजे बेबी नंदा. त्यांचा आणि शशी कपूर यांचा जब जब फूल खिले हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. कोल्हापूरशी असलेल्या नात्यामुळे त्यांनी ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘प्रेमग्रंथ’ चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात करण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी पन्हाळा परिसर, शालिनी स्टुडिओ, शालिनी पॅलेस येथे शशी कपूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काही स्पॉटची निवड केली होती.

 

Web Title: An emotional affair with Shashikpur Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.