हद्दवाढ विरोधात आता एल्गार
By Admin | Updated: June 7, 2014 01:04 IST2014-06-07T01:00:05+5:302014-06-07T01:04:52+5:30
संपतराव पवार : जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

हद्दवाढ विरोधात आता एल्गार
कोल्हापूर : महानगरपालिकेने उपनगरांसह शहरात काय विकास केला आहे, हे आतापर्यंत ग्रामीण जनतेने पाहिले आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नसताना गुण्यागोविंदाने ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला हद्दवाढीत का अडकविता? असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत १७ गावांचा समावेश शहरात होऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, एखादा निर्णय घेताना जनमानसाच्या भावनेचा विचार न करता तो लादण्याचा प्रयत्न केल्याने टोलसारखे भूत जनतेच्या मानेवर बसले आहे. आताही तीच चूक महापालिकेचे पदाधिकारी करीत आहेत. ग्रामीण जनतेचा विरोध असताना त्यांना कायद्याचे भय दाखवून शहरात आणले जाते, हे चुकीचे आहे. आमच्या जमिनी बागायती आहेत, शेतीपूरक व्यवसाय करून तरुण उपजीविका करीत आहेत. शहरात येऊन कोणाची तरी भांडी धुण्या पलीकडे काहीच मिळणार नाही.
नाथाजी पोवार (मोरेवाडी) म्हणाले, हा प्रश्न न्यायालयीन पातळीवर असला तरी जनभावनेचा विचार करावाच लागेल. १७ गावांच्या अकृषक रोजगाराची टक्केवारी चुकीची सादर केली आहे.
एकीकडे भूसलगतेचे कारण सांगायचे, मग त्यात पुलाची शिरोली, नागाव कसे आले आणि शिंगणापूर, हणमंतवाडी कशी बाहेर गेली, याचे उत्तर महापालिकेला द्यावेच लागेल. शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा जाणीवपूर्वक शहरात समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील नागरी सुविधा औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविल्या जातात. केवळ विकास निधी मिळविण्याच्या नादात सतरा गावांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेणार नाही.
‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत, आमचे शेतीपूरक व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात घरबांधणी परवाना पाचशे रुपयांना मिळतो, महापालिकेत त्यासाठी ५० हजार मोजावे लागतात. शहराचा विकास झाला पाहिजे, पण ग्रामीण जनतेला कोणी वेठीस धरू नये. प्रसंगी कायदेशीर लढाईची तयारीही आहे. राजू माने (उजळाईवाडी), प्रकाश पाटील (कळंबा), भगवान पलसे (वळीवडे), आदी उपस्थित होते.