अकरावी प्रवेशाचा ‘कट आॅफ’ सोमवारी समजणार

By Admin | Updated: July 15, 2017 16:51 IST2017-07-15T16:51:50+5:302017-07-15T16:51:50+5:30

निवडी यादी होणार प्रसिद्ध; मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही

The eleventh admission will be considered as 'cut off' on Monday | अकरावी प्रवेशाचा ‘कट आॅफ’ सोमवारी समजणार

अकरावी प्रवेशाचा ‘कट आॅफ’ सोमवारी समजणार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १५ : शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठीचा ‘कट आॅफ’ सोमवारी समजणार आहे. या दिवशी दुपारी तीन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मंगळवार (दि. १८)पासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया समितीकडून सध्या निवड यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठीची अंतिम मुदत उद्या,रविवारपर्यंत आहे. यावर्षी समितीकडे १२,३५९ प्रवेश अर्ज जमा झाले आहेत. त्यात सर्वाधिक ६२६८ अर्ज विज्ञान शाखेचे आहेत. त्यापाठोपाठ कला (मराठी) १,८६५, इंग्रजी ३९, वाणिज्य (मराठी) २,७४८ इंग्रजी १,४३९ असे अर्ज आहेत. या अर्जांची पडताळणी ‘ओएमआर’च्या माध्यमातून संगणकाद्वारे केली जात आहे. या निवड यादीची प्रसिद्धी सोमवारी होईल. संबंधित यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे.

निवड यादीतील विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया मंगळवार ते शुक्रवार (दि. २१)पर्यंत पूर्ण करावयाची आहे. यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी दि. २२ ते २४ जुलै या कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अकरावीच्या वर्गांचा प्रारंभ दि. २९ जुलैला होणार आहे.

दरम्यान, एकूण प्रवेश क्षमता आणि संकलित झालेले अर्जांची आकडेवारी लक्षात घेता ११४१ जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

प्रवेशाबाबतची आकडेवारी दृष्टिक्षेपात

शहरातील ३३ महाविद्यालयांतील एकूण प्रवेश क्षमता : १३५००

महाविद्यालयातील अकरावीच्या तुकड्यांची संख्या : १३१

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून विक्री झालेले अर्ज : १४२९९

समितीकडे जमा झालेले अर्ज : १२३५९

शहरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या : ७८१७

Web Title: The eleventh admission will be considered as 'cut off' on Monday